मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सध्या आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असून, ज्या गोष्टींना पूर्वी तुच्छ मानले जात होते, त्यांनाच आता ‘कॅश इन’ करण्याचे काम संघ करत आहे. आरएसएसचे चरित्र आता ‘डी-बेस’ आणि ‘डी-डिफाइन’ असे झाले आहे, अशी सडकून टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना गोलवलकरांच्या विचारांवरून जाहीर आव्हान दिले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोहन भागवत आज सर्वसमावेशकतेच्या गप्पा मारत असले तरी, त्यांनी एक गोष्ट स्पष्ट करावी—एम.एस. गोलवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये मांडलेला सांस्कृतिक रोडमॅप ते कंडेम (अमान्य) करतात का? मुंबईत मवाळ आणि उत्तर भारतात आक्रमक अशी दुटप्पी भूमिका संघ घेत आहे. उत्तर भारतात सामाजिक चळवळी रुजलेल्या नसल्याचा फायदा संघ उचलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Prakash ambedkar)
यूजीसीच्या नव्या इक्विटी नियमावलीचा संदर्भ देत ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०१२ मध्ये ही नियमावली केवळ एससी-एसटीसाठी होती, आता त्यात ओबीसींचा समावेश झाला आहे. मात्र, संघप्रेरित संघटना ओबीसींना यातून वगळण्यासाठी छुपे आंदोलन करत आहेत. ओबीसींवर होणाऱ्या अन्यायावर आरएसएसची चुप्पी ही चिंतेची बाब आहे.
सावरकरांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सावरकरांचे दोन चेहरे आहेत. अटकेपूर्वीचे सावरकर क्रांतिकारी होते, पण सुटकेनंतर त्यांनी ब्रिटिशांना मदत केली. पत्री सरकारच्या काळात क्रांतिकारकांना पकडून देण्याचे काम हिंदू महासभेने केले. अशा व्यक्तीला भारतरत्न देणे आम्हाला मान्य नाही, असे ते ठामपणे म्हणाले. (Prakash ambedkar)
देशाच्या सीमासुरक्षेबाबत बोलताना आंबेडकरांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली असतानाही सरकार आदेश का देत नाही? असा सवाल त्यांनी केला. गाठ्या आणि फाफड्यांकडून लढाऊ भूमिकेची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. चीनचे लक्ष भारताच्या ३५ कोटींच्या मध्यमवर्गीय ग्राहक बाजारपेठेवर आहे. जर आपण आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या सक्षम झालो नाही, तर भविष्यात मोठे संकट ओढवेल, असा इशारा त्यांनी दिला.
शेतकरी आत्महत्या आणि मंडी व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण दिले होते. मात्र, आज भाजप सरकार जागतिक करारांच्या नावाखाली ‘मंडी व्यवस्था’ मोडीत काढत आहे. गॅट कराराच्या काळात जशा आत्महत्या वाढल्या, तशीच स्थिती पुन्हा निर्माण होत असून सरकार बड्या कंपन्यांसाठी बाजारपेठ खुली करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Prakash ambedkar)
निवडणुकीतील गणितांवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने युतीकडे गांभीर्याने पाहिले नाही. मुंबईतील पदाधिकारी निरुत्साही होते. आम्ही मुस्लिम मतदार दूर जात असल्याचा इशारा दिला होता, पण काँग्रेसने आवश्यक पावले उचलली नाहीत. परिणामी, हक्काचा मतदार एमआयएमकडे वळला. काँग्रेसने युती निभावली असती, तर महापालिकेत ८०-८५ जागा जिंकता आल्या असत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी, डॉ. बाबासाहेबांच्या शब्दांची आठवण करून देत ते म्हणाले की, जर आपण आता सावध झालो नाही, तर भविष्यात दोष द्यायला कोणी उरणार नाही, दोष स्वतःलाच द्यावा लागेल.





