ॲड. प्रकाश आंबेडकर : सत्ता बदलली, तर शहर बदलेल
मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक प्रचार सुरू केला असून, या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नसून वंचित बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याची संधी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राज्यातील महापालिकांवर वर्षानुवर्षे मोजक्या लोकांचा ताबा राहिल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने १०५ जागांवर विजय मिळवत दोन ठिकाणी नगराध्यक्षपद पटकावले आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, आजचा मतदार फसवला गेलेला आहे. त्याला केवळ घोषणा नकोत, तर अधिकार हवेत. हे अधिकार वंचित बहुजन आघाडी देऊ शकते. आमच्या प्रचारसभांना होत असलेली गर्दी ही परिवर्तनाची नांदी आहे.
दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, मराठी माणूस, कामगार, सफाई कर्मचारी आणि झोपडपट्टीतील कुटुंबे आपल्या शहरासाठी निर्णय घेणाऱ्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्धार करत असल्याचे ते म्हणाले.
मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत असतानाही सामान्य मुंबईकरांचे प्रश्न सुटत नसल्याबाबत ॲड. आंबेडकर यांनी महापालिकेची संपत्ती लोकांसाठी न वापरता मोजक्या भांडवलदारांसाठी वापरली गेल्याचा आरोप केला. पाणी, आरोग्य, निवारा, शिक्षण आणि दळणवळण या मूलभूत सुविधा असूनही त्या सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे त्यांनी नमूद केले. वंचित बहुजन समाजाने वर्षानुवर्षे फक्त मतदान करून उपयोग नाही, तर निर्णयप्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. या घटकांनी सत्तेत सहभागी झाले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी ही सत्ताधारी बनण्याच्या स्पष्ट भूमिकेसह मैदानात उतरलेली राजकीय ताकद असल्याचा दावाही त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीने मूलभूत परिवर्तनाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांप्रमाणे हा केवळ आश्वासनांचा जाहीरनामा नसून शहराच्या विकासाचा आराखडा असल्याचे सांगत, बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू करणे, झोपडपट्टी पुनर्वसनात रहिवाशांना मालकी हक्क देणे, सफाई कामगार व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देणे यासारख्या मुद्द्यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
खासगीकरण आणि बिल्डर लॉबींबाबत बोलताना ॲड. आंबेडकर यांनी महापालिका लोकांच्या हातात असल्या पाहिजेत, दलालांच्या नाहीत, अशी भूमिका मांडली. निर्णयप्रक्रिया पारदर्शक केल्याशिवाय कॉर्पोरेट आणि बिल्डर लॉबींचा प्रभाव कमी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तरुण आणि माध्यमांच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी तरुणांनी केवळ ऑनलाईन प्रतिक्रिया न देता प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मुलामुलींनी वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन जेन-झीची ताकद दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 15 जानेवारीला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा. आपल्यासोबत मित्र, कुटुंबातील लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या. संविधानाने आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून दिलेल्या मताच्या अधिकाराचे महत्व ओळखा. ही वेळ तडजोडीची नसून निर्णयाची आहे. सत्ता वेळेनुसार बदलली नाही, तर हुकुमशाही जन्माला येते. शहराच्या विकासाची स्पष्ट दृष्टी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सत्तेत पाठवल्यास शहरांचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






