कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य जवळीक किंवा युतीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.
शिवसेनेला सोबत घेतल्यामुळे शिवसेनेने स्वतःची सीमा मर्यादित करून घेतली असून, यामुळे मुंबईतील महत्त्वाचे मतदार त्यांच्यापासून दुरावले असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे.
अमराठी आणि कुणबी समाज शिवसेनेवर नाराज :
प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या (उबाठा) सद्यस्थितीवर बोट ठेवले.
शिवसेनेने मनसेला सोबत घेतल्यामुळे मुंबईत राहणारा अमराठी माणूस आता शिवसेनेकडे वळण्यास तयार नाही. हा मोठा मतदारवर्ग आता पर्यायाच्या शोधात आहे. तसेच कोकणातील कुणबी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक आधारस्तंभ राहिला आहे. मात्र, जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून हा समाज सध्या संतप्त आहे. कोकणात जमिनीचा मोबदला कुणबी समाजाऐवजी खोतांना मिळाल्याचा आरोप करत, शिवसेनेने या प्रश्नावर काहीही केले नसल्याची भावना कुणबी समाजात आहे. मुंबईतील माथाडी कामगार आणि कोकणी माणूस शिवसेनेपासून लांब जात असल्याचे चित्र दिसल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘वंचित’ची स्थिती मजबूत :
शिवसेना आणि इतर पक्षांमधील या अंतर्गत नाराजीचा थेट फायदा वंचित बहुजन आघाडीला मिळत असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. परराज्यातून आलेला अमराठी नागरिक आणि प्रस्थापित राजकारणाला कंटाळलेला वर्ग आता ‘वंचित’कडे वळला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.






