संजीव चांदोरकर
अमेरिकेत अजून एक नवीन सट्टा बाजार: प्रेडिक्शन मार्केट ! ….जो भविष्यात भारतात देखील येऊ शकतो!
पैसे लावणे, हरणे , जिंकणे, पैज लावणे, पत्ते, जुगार, मटका, सट्टा तर फार पुरातन खेळ आहे. पण तो अनेक शतके खूप स्थानिक, कौटुंबिक, कम्युनिटी, गावाच्या , शहराच्या पातळीवर खेळाला जायचा. त्याला एक उद्योग म्हणून प्रस्थापित करणे, त्यात साऱ्या समाजाच्या, राष्ट्रातील, जगातील अब्जावधी डॉलरच्या बचती आकर्षित करणे, अगदी सामान्य नागरिकांना त्यात सहभागी करून घेणे ही अमेरिकेने जगाला दिलेली देणगी आहे.
मिस्टेक नॉट. उत्पादक कंपन्यांमधील गुंतवणुकीवर आधारित शेयर मार्केट आणि सट्टेबाजी हाच प्राण बनलेले शेयर मार्केट या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्याबद्दल नंतर. पण आपली पोस्ट वेगळ्या विषयावर आहे :
ऑप्शन ट्रेडिंग, क्रिप्टो, स्पोर्ट्स वरील जुगारा नंतर अमेरिकेतील सट्टा बाजारात अजून एक नवीन प्राणी: Prediction Market जोम धरत आहे.
या प्रेडिक्शन मार्केट मध्ये फक्त काय घडेल याचा अंदाज करून त्यावर पैसे लावले जातात. फार काही नाही दोनच ऑप्शन: हो किंवा नाही. हो” वर पैसे लावायचे किंवा “नाही” वर
उदा पुढील महिन्यात अमेरिकन फेड व्याजदर कमी करेल का ? हो किंवा नाही; न्यूयॉर्क महापौर निवडणूकीत ममदानी जिंकतील का ? हो किंवा नाही….. असे प्रश्न विचारून त्यावर बेटिंग घेणारे प्लॅटफॉर्म तूफान लोकप्रिय होत आहेत.
अमेरिकेत Kalshi आणि Polymarket या प्रमुख prediction प्लॅटफॉर्मवरील बेटिंग व्हॉल्यूम वेगाने वाढत आहेत.
या दोन प्लॅटफॉर्म वरील वाढणारा धंदा आणि नफा बघितल्यावर अनेक व्हेंचर कॅपिटल आणि इतर गुंतवणूकदार त्यांच्यात भांडवल गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. ज्याच्या मदतीने हे प्लॅटफॉर्म काही पटीने धंदा वाढवू शकतील. गुगल, न्यूयॉर्क स्टॉक मार्केट, कमोडिटी मार्केट, आणि खेळांच्या संघटना या बाजारात रस घेत आहे.
ड्रग्ज, दारू अशा व्यसनाची सार्वजनिक चर्चा होते त्यामानाने सट्टा लावण्याच्या व्यसनाची होत नाही.
संगीत, चित्रपट, ओ टी टी, यावर अमेरिकन नागरिक जेवढे एकत्रित खर्च करतात त्याच्या दहा पटीने विविध सट्टा लावण्यावर खर्च करतात.
२०१८ पूर्वी अमेरिकेत स्पोर्ट्स बेटिंग वर केंद्र सरकारची बंदी होती. ती त्या वर्षी सुप्रीम कोर्टाने उठवली. मग दोन तृतीयांश राज्य सरकारांनी त्याला कायदेशीर मान्यता दिली. आता स्पोर्ट्स बेटिंग चा व्यवसाय १६० बिलियन पर्यंत पोचला आहे.
अँड गेस व्हॉट?
ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांचा एक मुलगा एका स्पोर्ट्स बेटिंग कंपनीला सल्लागार म्हणून जॉइन झाला आहे. ट्रम्प यांची Truth Social ही कंपनी स्वतःचे Truth Predict नावाचे प्रॉडक्ट लाँच करणार आहे.
लक्षात घ्या हे सर्व अमेरिकेतील कायद्यांना धरून आणि रेग्युलेटर्सच्या परवानग्या घेऊन होत आहे. बेकायदेशीर काही नाही. ही माहिती खास “अण्णा” लोकांसाठी. ज्यांना राजकीय अर्थव्यवस्था मधील ओ का ठो कळत नाही.
( सर्व माहिती अमेरिकेतील Scott Galloway यांच्या न्यूजलेटर वरून. ज्यांना इंटरेस्ट आहे ते गुगल करू शकतात)
काही हजार किलोमीटर दूर अमेरिकेत काय सुरु आहे याची माहिती आपण का ठेवायची ?
आय पी ओ मधील गुंतवणूक खरेतर दीर्घकालीन असावी. पण आपल्या देशात, पैसे घालून शेयर लिस्ट झाल्या झाल्या मिळतील ते वरचे पैसे खिशात घालून पुढच्या आय पी ओ मध्ये घालणारे आहेत. ऑप्शन सारख्या गुंतागुंतीच्या प्रॉडक्ट मध्ये आपल्या देशात होणारी उलाढाल, सेबीने बंदी घालण्यापूर्वी, जगात सर्वात जास्त होती. अशा आपल्या देशात प्रेडिक्शन मार्केट आले तर ?
हाताला काम नाही, काम असले तर पुरेसे वेतन नाही. दुसऱ्या बाजूला जाहिराती आणि स्थलांतरण यामुळे भौतिक आकांक्षाना आग लागलेली. तिसऱ्या बाजूला जवानी स्वस्थ बसू देत नाही. असे कोट्यावधी तरुण आपल्या देशात आहेत. अशा देशात सट्टेबाजीतून मिळू शकणाऱ्या क्विक इन्कमकडे ते वळणारच….. हे सगळे अनेक अर्थाने गंभीर आहे.
मला काय म्हणायचे आहे ते हृदयात concern असणाऱ्या वाचकांना नक्की कळेल.






