पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यात ‘विराट धडक मोर्चा’ आयोजित केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाचा मोर्चा पुणे एसआरए (SRA) कार्यालयावर धडकणार आहे.
एसआरएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि झोपडीवासीयांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा ‘विराट धडक मोर्चा’ काढण्यात येत आहे.
या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. महायुती सरकार आणि एसआरएच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेत हा मोर्चा थोड्याच वेळात कृषी महाविद्यालय (शिवाजीनगर) येथील म्हसोबा मंदिर येथून एसआरए कार्यालयाच्या दिशेने निघणार आहे.
एसआरएच्या कामातील अनियमितता आणि बिल्डरधार्जिण्या भूमिकेमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात लक्ष वेधले गेले आहे.






