मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असतानाच, हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा (Heavy to Very Heavy Rainfall) गंभीर इशारा दिला आहे.
आज ८ जिल्ह्यांना ‘अतिवृष्टी’चा धोकाआज, गुरुवारपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकण : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.
पश्चिम महाराष्ट्र : पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या संवेदनशील भागांवर ‘अतिमुसळधार’ पावसाचे सावट आहे.
विदर्भ : यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
या भागात विजांच्या कडकडाटासह वादळे आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट
हवामान विभागाने आज यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
याव्यतिरिक्त, कोकण (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर), मराठवाडा (परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव) आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांसह एकूण २० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
शनिवार आणि रविवार अधिक गंभीरराज्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
शुक्रवार (उद्या): मुंबईसह १८ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा आहे. रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’ तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता संपूर्ण महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
शनिवार (27 सप्टेंबर): हा दिवस अधिक गंभीर असणार आहे. २१ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा असून, मुंबई, ठाणे, संपूर्ण कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
रविवार (28 सप्टेंबर): या दिवशीही परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे. २२ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा असून, कोकण आणि घाटमाथा पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’ मध्ये आहेत.
शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.