मुंबई : महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित जन आक्रोश आंदोलन मोर्चा मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडला.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी भीमराव आंबेडकर म्हणाले की , “महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमी ही आमच्या अस्मितेची आणि स्फूर्तीची धरोहर आहे. ही ठिकाणे सरकारने तातडीने बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
बोधगया मंदिर अधिनियम 1949 हा संविधानातील अनुच्छेद 25, 26 आणि 13 च्या विरोधात असून अन्यायकारक आहे. या अधिनियमानुसार 9 सदस्यीय समितीत केवळ 4 बौद्ध सदस्य आहेत, जे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे महाबोधी महाविहारचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवावे.
महू जन्मभूमी स्मारक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी बांधलेल्या स्मारकाचे व्यवस्थापन त्यांच्या विचारधारेच्या विरोधात चालत आहे. स्मारकाचे संपूर्ण व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे द्यावे.नागपूर दीक्षाभूमीचे मूळ शासकीय संमतीपत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असूनही, दीक्षाभूमी स्मारक समितीने बेकायदेशीर कब्जा केला आहे.
पार्किंगच्या नावाखाली स्मारकाचे विद्रूपीकरण थांबवून व्यवस्थापन परत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे द्यावे.डॉ. आंबेडकर यांनी पुढे असेही प्रतिपादन केले की, “मौर्य, कुशवाह, यादव हे आपलेच आहेत. त्यांच्याशी संवाद साधून आपण सत्तेत येऊन आपल्या धरोहरांचे रक्षण केले पाहिजे.” या आंदोलनाला बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा लाभला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मुंबई प्रदेशचे चेतन अहिरे आणि स्नेहल सोहनी यांनी सहभाग नोंदवला. मोर्चामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदाधिकारी, समता सैनिक दलाचे अधिकारी, महिला आघाडी, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई परिसरातील हजारो बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाचे वैशिष्ट्य :
सुमारे ५,००० जनसमुदाय आझाद मैदानावर एकवटला. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने मोर्चा पार पडला. विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. या आंदोलनामुळे सरकारवर तीव्र दबाव निर्माण झाला असून, बौद्ध समाजाच्या तीन ऐतिहासिक वास्तूंच्या ताब्याची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.