संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीक!
पुणे : पुण्यात संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले असतानाही पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया (X) हँडलवरून ट्विट करत त्यांनी म्हटले की, राज्यातील सत्ताधारी म्हणतात की, आम्हाला आता संशोधकांची गरज नाही; आम्हाला त्या ठिकाणी कौशल्ये विकसित करायची आहेत. हे दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक आहे.
तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, शासनाने समाजाच्या मागणीनुसार विविध संस्था स्थापन केल्या असल्या तरी आता ‘समान नियमावली’ लागू करण्याचे कारणच अस्तित्वात नसते, जर संस्था एकसंध असत्या. “संघटन एक असूनही बजेट हेड वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे लाभ व्यवस्थित पोहचत नाहीत. सरकारचा ‘डिव्हाइड अँड रूल’ फंडा यामागे आहे,” अशी टीका त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, या आंदोलनाचे केंद्र मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काल अनेक संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यांच्या संशोधनाचे महत्त्व समजून घेतले आहे. “या लढ्यात आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत,” असेही ते बोलले.