अकोला : यवतमाळ जिल्ह्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज अकोला येथील यशवंत भवनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा न.प. यवतमाळचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे, न.प. यवतमाळच्या नगरसेविका मीरा वीर, तसेच न.प. घाटंजीच्या नगरसेविका पायल कांबळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली.
भेटीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे मार्गदर्शन बाळासाहेबांनी केले. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी, मोर्चेबांधणी व रणनीती याबाबत जिल्हाध्यक्षांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
विजयी उमेदवारांचे कौतुक करत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले व लोकहिताची कामे प्राधान्याने करत पुढील निवडणुकांचे नियोजन आतापासूनच सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या निवडणुकीतील यशामुळे यवतमाळ जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव वाढणार असून, पक्षात नव्या कार्यकर्त्यांची व सदस्यांची मोठ्या प्रमाणात भर पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी घाटंजी तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे, अशोकजी कयापाक आणि रामदास वीर यांचीही उपस्थिती होती. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागून पक्षाला सर्व पातळ्यांवर यश मिळवून देतील, अशी आशा यानिमित्ताने निर्माण झाली आहे.






