मुंबई : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी कोण रोखत आहे असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोघांनाही VBA सोबत युती करण्यासाठी अधिकारपत्र दिले आहे का?
काँग्रेसला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीशी थेट बोलण्यासाठी आणि आम्हाला आमंत्रित करण्यापासून काय रोखत आहे? असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.
आजच माध्यमांशी बोलतांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश हा निवडणूक जाहीर झाल्यानंतर होईल, अशा स्वरूपाचे विधान केले आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सतत युतीसाठीचा पत्रव्यवहार करुनही ‘वंचित’ला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे नेते माध्यमांसमोर मात्र वंचित आमच्या सोबत असल्याचे म्हणत असतात. परंतु अद्यापही वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत सहभाग झालेला नाहीये.
नुकत्याच अमरावतीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात भाष्य केले होते की, कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्याला वापरत आलात त्याच पद्धतीने जर वंचित ला वापरायचा विचार केला तर, मोदी सोबत आम्ही तुम्हालाही गाडू एवढ लक्षात ठेवा.