अकोला येथे नामांकन रॅलीत उसळला जनसागर
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आपण बोलतच आलो आहोत. पण, आता आपल्याला मतदानाच्या माध्यमातून कृती करायची आहे. त्यामुळे २० दिवस सर्व कामे बाजूला ठेवून, निवडणुकीच्या प्रचारात आपण असले पाहिजे.
आंबेडकर म्हणाले, ज्या बुथ कमिट्या झाल्या आहेत. त्यांनी आपापले बुथ सांभाळले पाहिजे. जो मतदार मत देणारा आहे. त्याला बुथपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. जो पक्षाचा कार्यक्रम आहे. तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची गरज आहे, या सगळ्या गोष्टी आपण कराल ही अपेक्षा बाळगतो. तसेच, उद्याचा असणारा विजय आपण खेचून आणाल अशी जिद्द आपण सगळे बाळगूया, असे म्हणत त्यांनी जनतेवरचा विश्वास व्यक्त केला. या वेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नवीन गीताचे उद् घाटन करण्यात आले. या पक्षाच्या नव्या गीताचे उपस्थितांनी जल्लोष करून स्वागत केले. नामांकन रॅलीत ॲड. आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी हजारो अकोलाकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या रॅलीत सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित होते. या रॅलीमध्ये मी माळी, मी मुस्लिम, मी गरीब मराठा, मी धनगर, मी कुणबी, मी विद्यार्थी असे फलक दिसून आले.
तसेच, या प्रसंगी आंबेडकर यांच्यासह, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, नीलेश विश्वकर्मा, गोविंद दळवी, बालाजी शिंदे, सुभाष रवंदळे, हमराज उईके, अफसर खान, संगीताताई आढाव, प्रतिभाताई शिरसाट, प्रमोद देंडगे, मिलिंद इंगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.