नाशिक : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवावी आणि अल्पसंख्याक, अनुसूचित जाती व जमातींच्या प्रभागांची तोडफोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी आग्रही भूमिका मांडली. (Nashik)
शिंदे यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला की, जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून राजकीय दबावाखाली प्रभाग रचना केली गेली, तर त्या गंभीर परिणामांसाठी संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनावरच राहील.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून, अशा वेळी नाशिकच्या प्रभाग रचनेवर राजकीय प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
2017 मध्ये जनगणना व शासनाच्या निकषांनुसार समतोल साधणारी रचना होती. मात्र, सध्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काही प्रभागांमध्ये हेतुपुरस्सर तोडफोड करून अल्पसंख्याक, एससी आणि एसटी घटकांचे मतविभाजन होईल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Nashik)
राजकीय फायद्यासाठी समाजघटकांमध्ये फूट पाडण्याचा कुठलाही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक व न्याय्य प्रक्रिया राबवावी, अन्यथा सामाजिक सलोखा धोक्यात येईल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
या निवेदनप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक राज्य प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, उपमहानगर प्रमुख सुनील साळवे, उपजिल्हाध्यक्ष तुकाराम मोजड, युवक महासचिव दीपक पगारे, राहुल पटेकर, राजू गोतीस, विश्वनाथ भालेराव, सुरज गांगुर्डे, विशाल हिवराळे, युवराज मनेरे, रवी पगारे, शहराध्यक्ष युवक अतुल जाधव, करण दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Nashik)