वंचित बहुजन आघाडीने दाखल केली तक्रार
अकोला : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असताना आज फोर्स मोटर्सकडून लोकमत या दैनिकात पहिल्या पानावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यात भारतीय सशस्त्र दलाचे नाव छायाचित्र आणि मोदीच्या फोटोचा वापर करीत आत्मनिर्भर भारतची जाहिरात करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे आदर्श आचारसंहिता भंग करणारे असून, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सी व्हिझीलवर तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आदर्श आचारसंहिता सुरू असताना सैन्य दलाचे छायाचित्र आणि नाव वापरून कुठलीही जाहिरात प्रकाशित करता येत नाही. तरीही आज सर्व जिल्हा आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर फोर्स मोटर्सकडून जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
या जाहिरातीमध्ये भाजपचे ‘आत्मनिर्भर भारत’ हे घोषवाक्य आणि प्रधानमंत्री मोदी यांचे छायाचित्र देखील आहे. या जाहिरातीमध्ये “आत्मनिर्भर” भारताच्या संकल्पनेला सशक्त करणारा फोर्स, संरक्षण क्षमतांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवल्याबद्दल आम्ही पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो, असे म्हटले आहे.
जाहिरातीमध्ये फोर्स मोटर्सला भारतीय सशस्त्र दलांसाठी खास विकसित केलेल्या लाईट स्ट्राइक व्हेइकल्सचा (एलएसव्ही) पुरवठादार असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे नमूद करून www.forcemotors.com ह्या वेबसाईटची लिंक देखील देण्यात आली आहे.
हा अतिशय गंभीर प्रकार आहे. भारतीय आर्म फोर्सेसचे नाव, छायाचित्र एका खासगी कंपनीने केवळ वाहन पुरवठा केले म्हणून निवडणूक काळात भाजप आणि मोदीचा प्रचार करण्यासाठी वापरणे, हा देशद्रोह असून लोकसभा निवडणुकीच्या निष्पक्ष निवडणुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे. केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार 90 मिनिटांमध्ये कारवाई करून फोर्स मोटर्स व्यवस्थापनाविरूद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.