परभणी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परभणीतून निवडणूक प्रचाराचा जोरदार सुरुवात करण्यात आली. “जोपर्यंत वंचित घटकांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जात नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनात बदल शक्य नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

‘शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना’
जाहीर सभेला संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “बाबासाहेबांनी सर्व मागासवर्गीयांना केवळ शिक्षण घेण्याचाच नव्हे, तर ‘सत्ताधारी’ बनण्याचा संदेश दिला होता. जोपर्यंत सत्तेच्या चाव्या आपल्या हातात येत नाहीत, तोपर्यंत आपल्या प्रश्नांची तड लागणार नाही.”

महापालिका निवडणुकीसाठी सुजात आंबेडकर मैदानात; सोलापूर आणि लातूरमध्ये आज झंझावाती दौरा!
“वंचितांचा महापौर निवडून आणायचा असेल, तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणे अनिवार्य आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या मतदारांनी जर १०० टक्के मतदान केले, तर वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पॅनल निवडून येतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी हाच सर्वसामान्यांसाठी एकमेव पर्याय असल्याचे सांगत, त्यांनी जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पदाधिकारी तसेच परभणीतील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती, ज्यामुळे आगामी निवडणुकीत ‘वंचित’ मोठी मुसंडी मारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.






