औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)च्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना संपर्क केला होता मात्र, नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिसांना दोन स्पष्ट पर्याय दिले आहेत,
१. RSS ची नोंदणी झालेली असेल, तर तिचे नोंदणी प्रमाणपत्र दाखवा; आम्ही तत्काळ मोर्चा रद्द करू.
२. जर RSS ही अनधिकृत संघटना असेल, तर तिच्यावर गुन्हा दाखल करा; त्यानंतर आम्ही मोर्चा रद्द करू.
दोन्हीपैकी कोणतीही कारवाई प्रशासन करणार नसेल, तर RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर आम्ही ठाम आहोत, अशी ठाम भूमिका अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.
शहरात आरएसएसकडून कॉलेजच्या आवारात विना परवानगी स्टॉल लावण्यात आले होते. त्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडी अध्यक्ष राहुल मकासरे यांनी विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी मकासरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आज औरंगाबाद पोलीस आयुक्त यांना भेटून जन आक्रोश मोर्च्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी ती परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढूच अशी घोषणा केली आहे. शहरातील सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी पक्ष, संघटना, नेते आणि जनतेला या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद शहरकडून करण्यात आले आहे.