वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्रशासनाने जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, मात्र त्यांनी याला नाकार दिला. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आरएसएस कार्यक्रमांना परवानगी, बहुजन महामानवांना विरोध?सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर गंभीर आरोप केला आहे. याच विद्यापीठात सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आणि त्यांच्या विचारधारेचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यांना त्वरित परवानगी देखील मिळते. मात्र, बहुजन विचारवंतांच्या आणि महामानवांच्या जयंती कार्यक्रमांना मात्र जाणूनबुजून विरोध केला जातो.
भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष कमलेश उबाळे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपच्या धोरणावर टीका करताना म्हटले की, “एका बाजूला हे लोक आदिवासी राष्ट्रपतींना सर्वोच्च स्थान दिल्याचे सांगतात, पण दुसऱ्या बाजूला आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारतात.”
“हा स्पष्टपणे मनुवादी अजेंडा आहे,” असा थेट आरोप उबाळे यांनी केला.
वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनाचा इशाराया कृतीला वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि सम्यक विद्यार्थी आंदोलक जोरदार विरोध करतील, असा इशारा कमलेश उबाळे यांनी दिला आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर विद्यापीठाबाहेर मोठा मोर्चा काढण्याचा इशाराही सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.






