अकोला : मध्यप्रदेशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची जाळपोळ करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर राष्ट्रविरोधी कलमान्वये (UAPA) कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत काही समाजविघातक घटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळण्याचे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले असून, वंचित बहुजन युवा आघाडीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. (Mumbai protest)
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नसून ते भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्यांचा अपमान करणे हा लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे,” अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. ही घटना “मनुवादी” प्रवृत्तीतून आणि दलित स्वाभिमानाबद्दलच्या द्वेषातून घडली असून, हे देशाच्या विभाजनाचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

“प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेशिवाय असे धाडस करणे शक्य नाही. जर अशा राष्ट्रविरोधी घटकांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर याकडे सरकारी संमती म्हणून पाहिले जाईल.” असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगारांवर ‘राष्ट्रविरोधी क्रियाकलाप कायदा’ (UAPA) आणि ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. (Mumbai protest)
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
यावेळी वैभव खडसे (महानगर अध्यक्ष), सुगत डोंगरे (बाळापूर तालुका अध्यक्ष), जय तायडे (माजी महानगर अध्यक्ष), आकाश जंजाळ (प्रसिद्धी प्रमुख), सूरज दामोदर (मीडिया प्रमुख), रवि गीते, अमोल वानखडे (उपाध्यक्ष), विजय डोंगरे, शेट्टी डोंगरे, सचिन डोंगरे, आदेश उमाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Mumbai protest)






