मुंबई : वंचित बहुजन युवक आघाडी, मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने आयोजित “प्रभाग समन्वयक सन्मान सोहळा विक्रोळी येथील तथागत बुद्ध विहार, आंबेडकर सोसायटी, पार्कसाईट येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान युवा मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई यांनी भूषविले. कार्यक्रमास मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे आणि मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा स्नेहल सोहनी या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. दोन्ही मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध प्रभागांमधील युवक समन्वयकांना वही, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केवळ पदाचा नव्हता, तर जबाबदारी आणि संघटनात्मक कार्याचा गौरव होता.
या प्रसंगी युवक प्रभाग समन्वयकांनी आपली मते मांडत, “आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू,” अशी प्रतिज्ञा व्यक्त केली.
यावेळी मुंबई युवक महासचिव गौतम पाईकराव, प्रदीप अडांगळे, विपुल हिरे, दीप्ती गोडबोले, संघटक मयूर आठवले आणि प्रकाश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी युवक आघाडीच्या आगामी दिशा, जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक कार्य यावर मार्गदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी आपल्या भाषणात पुरुष, महिला आणि युवक या तीनही आघाड्यांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. तर महिला प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी युवकांसोबत खांद्याला खांदा लावून संघटनेला अधिक बळकट करण्याचा संदेश देत युवकांचे मनोबल उंचावले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महासचिव प्रा. रोनक जाधव यांनी केले. यावेळी पाॅवरपाॅईंट सादरीकरणाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या विविध आंदोलन, न्यायालयीन लढे आणि संघटनात्मक कार्याचा आढावा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवटी सर्वांनी निवडणुकीत जिंकण्याचा निर्धार केला.