चंद्रपूर : रक्षाबंधनाचा सण केवळ बहिण-भावाच्या प्रेमापुरता मर्यादित न ठेवता, समाजाला एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने अनोखा उपक्रम राबवला. चंद्रपूर महानगर अध्यक्षा तनुजाताई रायपुरे यांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधल्या आणि त्यांना नागरिकांच्या संरक्षणाच्या त्यांच्या मूळ कर्तव्याची आठवण करून दिली.
यावेळी महिला आघाडीने काही अप्रिय घटनांचा उल्लेख केला. यामध्ये पुणे पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी महिलांशी दादागिरीने वर्तन केल्याचा आणि तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांशी बंधुभावाने न वागल्याचा अनुभव सांगितला. समाजामध्ये काही वेळा पोलीस हेच रक्षकऐवजी भक्षक बनल्याचेही दिसून येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल, तर किमान रक्षाबंधनाच्या नात्याने तरी पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल. याच विचारातून, पोलीस कर्मचाऱ्यांना स्त्री-पुरुष नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांचा अपमान करण्याचा आपला कोणताही उद्देश नसून, त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याची जाणीव करून देणे हाच यामागे हेतू असल्याचे महिला कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यावर त्यांनी भर दिला.
या अनोख्या उपक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीही महिलांच्या भावनांचा आदर करत त्यांच्या कार्याचे महत्त्व जपण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमात महानगर महासचीव मोनाली पाटील, चंद्रप्रभा रामटेके, विजया भगत, मंजुषा निरंजने, ललिता दुर्गे, गीता कोंडावार यांची उपस्थिती होती.
जालना महानगरपालिका निवडणूक २०२५: वंचित बहुजन आघाडीचे बिगुल; १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
जालना : आगामी जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात आघाडी...
Read moreDetails






