जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला. त्यांनी काही रुग्णांची भेट घेतल्यानंतर हा इशारा दिला आहे.
जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबता थांबत नाही. तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार वेगभेळे कारण सांगून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात येते. यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना दिली होती.
त्यानंतर विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत तेथील आढावा घेतला. त्यानंतर मात्र त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.