नगरपालिका, नगरपंचायतीत दाखवलेली एकजूट, महानगरपालिका निवडणुकीतही दाखवा!
- धनंजय कांबळे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडत आहे, ते केवळ एखाद्या निवडणुकीपुरते मर्यादित नाही; तो एक मूलभूत राजकीय बदलाचा स्पष्ट संकेत आहे. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला मिळालेला भक्कम जनादेश हा फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर जनतेने पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केल्याचा परिणाम आहे. आरएसएसप्रणीत राजकारणाच्या विरोधात उभ्या असलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला मतदान करून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहायला सुरुवात केली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडून आलेल्या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अभिनंदन करताना स्पष्टपणे सांगितले की, हे यश वंचित बहुजन आघाडीसह महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, आजी-माजी पदाधिकारी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीचे फलित आहे. तळागाळात राबणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केलेली ही लढाई अखेर यशात रूपांतरित झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एकूणच राजकीय स्थितीकडे पाहिले तर, भाजपप्रणीत महायुतीने पैसा, सत्ता, यंत्रणा आणि माध्यमांच्या जोरावर उभे केलेले प्रचंड आव्हान, तसेच दुसरीकडे मविआतील प्रस्थापित पक्षांची सरंजामी मानसिकता या दोहोंच्या मधल्या फटीतून वंचित बहुजन आघाडीने सत्तेकडे थेट मुसंडी मारली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे केवळ आकड्यांचे यश नाही, तर प्रस्थापित राजकीय संस्कृतीला दिलेला जबरदस्त धक्का आहे.
या निवडणुकांत पैसा कसा ओसंडून वाहिला, याची उदाहरणे थक्क करणारी आहेत. आजच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या नव्हे तर ठेकेदार, उद्योगपती आणि राजकीय दलालांच्या हातात गेल्याचे विदारक वास्तव कुणीच पुसू शकत नाही. निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि सत्ताधाऱ्यांना पोषक माध्यमांची भूमिका यामुळे महायुतीचा विजय अधिक सुलभ झाला, हे नाकारता येणार नाही. मात्र, या सगळ्या अपप्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवरही वंचित बहुजन आघाडीचे सामान्य, चेहरा नसलेले आणि पिढ्यानपिढ्या राजकारणापासून व्यवस्थेने दूर ठेवले गेलेले उमेदवार मोठ्या फरकाने जिंकतात, ही बाबच प्रस्थापित राजकारणाच्या अपयशाची साक्ष देते.
मविआतील पक्षांनी गेली दहा वर्षे वंचित बहुजन आघाडीची केलेली हेटाळणी आणि उपेक्षा आज त्यांच्याच अंगलट आली आहे. संविधानाची भाषा बोलायची, पण प्रत्यक्षात मात्र विषमता, सरंजामी, जातीवादी मग्रुरी आणि सत्तेची मक्तेदारी कायम ठेवायची ही दुटप्पी भूमिका मतदारांनी ठामपणे नाकारली आहे.
या सगळ्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे यश अधिक ठळकपणे समोर येते. कोणतीही युती नाही, कोणताही सत्तेचा पाठिंबा नाही, तरीही स्वबळावर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितचा विजयाचा झेंडा फडकतो आहे. वंचित बहुजन समाज फक्त मतदार नाही, तर तो सत्ताधारीही बनू शकतो. हा ठाम विश्वास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच दिला आहे.
या यशामागे बाळासाहेब आंबेडकरांची दीर्घकालीन राजकीय दूरदृष्टी, अचूक रणनिती आणि ठाम भूमिका आहे. शरद पवार वगळता विरोधकांकडे असा अनुभव आणि वैचारिक स्पष्टता असलेला नेता नाही; आणि शरद पवार स्वतः त्यांच्या संधीसाधू राजकारणाचे बळी ठरले आहेत. अशा वेळी बाळासाहेब आंबेडकरांनी एकाकी लढत देत सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. त्याला सुजात आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या झंझावाती प्रचारसभांची धार आणि थेट प्रश्न विचारण्याची हिंमत यांची भक्कम साथ मिळाली.
या यशाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. काँग्रेसच्या AICC नेतृत्वाने राजगृहावर येऊन बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेणे, हेच दर्शवते की भाजप–आरएसएसच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणतेही प्रभावी राजकारण शक्य नाही, हे भान आता प्रस्थापित पक्षांना येऊ लागले आहे. मात्र, केवळ प्रस्ताव मांडणे आणि खऱ्या अर्थाने समान पातळीवर बोलणी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वंचितांना किरकोळ समजण्याची चूक पुन्हा केल्यास त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे.
“अकोला पॅटर्न” हा केवळ एक राजकीय प्रयोग नाही, तर नव्या इतिहासाचा प्रारंभ आहे. ओबीसी, मुस्लिम, बौद्ध, भटके-विमुक्त, आदिवासी या व्यवस्थेने सातत्याने नाकारलेल्या समाजघटकांचा थेट सत्तेच्या दालनात प्रवेश होत आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सत्तेच्या प्रत्येक पायरीवर वंचित समाज बसू शकतो, हा आत्मविश्वास या निवडणुकीने निर्माण केला आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत जी एकजूट सर्व मतदारांनी दाखवले, तीच एकी आणि एकजूट महानगरपालिका निवडणुकीत दाखवून शहराशहरांना काबीज करूया…
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी योग्य रणनिती आखून दीर्घकालीन लढाईची तयारी करणे अत्यावश्यक आहे. कारण हा विजय अंतिम नाही; तो नव्या क्रांतीचा आरंभ आहे. ४२ वर्षांचा त्याग, समर्पण, स्वाभिमान आणि ठाम धोरण यांचे फळ आज दिसू लागले आहे. आता हा व्यापक जागृतीचा विस्तव विझू न देता, बाबासाहेबांनी सांगितलेल्या सत्ताधारी जमात बनण्याच्या दिशेने वंचितांना सत्तेच्या दालनात कायमस्वरूपी स्थान मिळवणे हीच खरी कसोटी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आता आपल्यासमोर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आव्हान आहे. आज नगरपालिका निवडणुकीत दाखवलेली एकजूट आणि निष्ठा कायम ठेवून हा विजयाचा रथ महाराष्ट्रातील महानगरांमध्ये विजयपताका फडकावत पुढे घेऊन जायचा आहे. वंचित बहुजन समाज एक झाल्यावर सत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो; चेहरा नसलेली माणसेही राजकारणात आपले ठोस अस्तित्व निर्माण करू शकतात. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, एकीने या रणांगणात उतरूया. आजचा उत्साह टिकवून इथल्या शहराशहरांना वंचितांच्या एकजुटीने काबीज करूया. कारण असे केले, तर दिल्ली आपल्याला दूर नाही, हे निश्चित!






