मुंबई : कुर्ला विभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन आघाडीने आज अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
कुर्ला विभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, आरोग्यसुविधा यांसारखे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यंत्रसामुग्री वाटपाच्या नावाखाली महिलांकडून विश्वासाने कागदपत्रे गोळा करण्यात आली, मात्र ही माहिती काही राजकीय पक्षांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. पुरावेही प्रशासनाकडे दिले असल्याचे पक्षाचे नेते स्वप्नील जवळगेकर यांनी सांगितले.
अधिकारी चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे देतात किंवा कधी तक्रारींवर उत्तरच देत नाहीत, या निष्क्रिय आणि पक्षपाती कारभाराचा निषेध करण्यासाठी स्वप्नील जवळगेकर यांनी सहाय्यक आयुक्तांना पाटी व पेन्सिल भेट देऊन अनोखा निषेध नोंदवला.
या प्रसंगी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी, संतोष अबुलगे, संध्या पगारे, मालती वाघ, अनिल म्हस्के, अरविंद पवार, सुशांत माने, अशोक आहिरे, सूर्यकांत कांबळे, समीर जगताप, पंकज झणकार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तथापि, जर कामकाजात सुधारणा झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा स्वप्नील जवळगेकर यांनी दिला.