औरंगाबाद : दिल्ली येथे विविध राज्यांतून शेतकरी एकत्र येऊन न्याय पद्धतीने, लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असूनही केंद्र सरकार या बाबतीत उदासीन आहे. याविरोधात औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
कठीण परिश्रम घेऊन शेती पिकवून सर्वांचे पोट भरणारा शेतकरी उपाशी आहे. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ या सरकारने आणली असून, उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याचा सपाटा लावला आहे. या कृतीचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याची भूमिका वंचितने मांडली आहे. तसेच, त्यांना न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल रोको करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीने दिला आहे.
या वेळी जिल्हा, शहर, कामगार आघाडी तसेच युवा राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईंगळ, मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बगले, योगेश बन, महिला जिल्हाध्यक्ष लताताई बामणे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड आणि कामगार आघाडी अध्यक्ष कडुबा जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.