अकोला :आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहोत, त्यांचे नेतृत्व आम्ही करतो याची प्रचिती औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीमधून दिसली. औरंगाबादमधील एका छोट्याशा हॉटेलमध्ये भेळ आणि वडापावचा आस्वाद घेताना त्यांचा फोटो समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ॲड.आंबेडकरांचा हा साधेपणा नेहमीच पाहायला मिळत असतो. मुंबई येथील सभा संपल्यानंतर त्यांनी पावभाजीचा घेतलेला आस्वाद असो किंवा रस्त्यावरून जात असताना चहाच्या टपरीवर घेतलेला चहा असो.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी सुद्धा हा साधेपणा जपला आहे. अकोला शहरात गांधी चौक येथे पाणीपुरीच्या स्टॉलवर त्यांनी पाणीपुरी आणि आलू चाटचा आस्वाद घेतला. त्याचा देखील फोटो समाज माध्यमांवर पाहायला मिळाला. आंबेडकर नावाचे एवढे मोठे वलय असताना सुद्धा सर्वसामान्य जनतेत वावरत मिस्टर अँड मिसेस आंबेडकरांनी सामान्यांना आम्ही आपल्यासोबत असल्याचा विश्वास वेळोवेळी दिला आहे. त्यांच्यासाठी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेतल्या आहेत. ऐशोआरमाचे जीवन नाकारून सामान्यांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून न्याय द्यायचे कार्य केले आहे.
सामान्य जनतेमध्ये सुद्धा आंबेडकरांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. त्यांच्या सभा आणि परिषदांना लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. वंचितांना राजकारणात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य ॲड. आंबेडकरांनी केल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू झाली आहे.त्यामुळे येणारा काळ वंचितांसाठी परिवर्तनाचा असेल अस म्हणलं वावग ठरणार नाही.