सिद्धार्थ मोकळे : माध्यमांनी शहानिशा न करता बातम्या देऊ नयेत
मुंबई : वंचित बहुजनांच्या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचा दिसून येत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स हॅंडलवर व्हीडिओ पोस्ट करत केली आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. आज काही चॅनल्सनी वंचित बहुजन आघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही, असे म्हटले आहे.
मोकळे यांनी म्हटले आहे की, आम्हाला महाविकास आघाडीकडून अकोला आणि इतर दोन अशा एकूण तीन जागांचा प्रस्ताव आलेला होता, तो आम्ही नाकारलेला आहे. त्यानंतर या पद्धतीच्या पाच आणि सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत. त्यात कुठलेही तथ्य नाही. माध्यमांना आमची विनंती आहे, आमच्याबद्दल बातमी देताना आम्हाला फोन करा एकदा कन्फर्म करा आणि मगच बातमी द्या. वंचित बहुजनांचं राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत, त्यात कृपया अशा खोट्या बातम्या देऊन आडकाठी आणू नका असेही मोकळे यांनी म्हटले आहे.