मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर अखेर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीसोबतच खात्यांच्या वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी खेळी खेळल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवलेली जबाबदारीनुसार तीन महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे:
– राज्य उत्पादन शुल्क
– क्रीडा व युवक कल्याण
– अल्पसंख्याक विकास व वक्फ ही खाते देण्यात आली आहेत.
अर्थ खात्यावरून भाजपची ‘मोठी खेळी’
सर्वात महत्त्वाची आणि चर्चेची बाब म्हणजे, अजित पवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे अर्थ व नियोजन खाते होते. अजित पवारांच्या निधनानंतर हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, नव्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खाते काढून घेण्यात आले आहे.
अर्थ खाते आपल्याकडेच ठेवून भाजपने महायुतीमधील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेत भाजपने ही ‘राजकीय खेळी’ खेळल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देऊन सहानुभूती आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी अर्थ खाते काढून घेतल्याने सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) ताकद कमी होण्याची शक्यता आहे.





