बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या बुलढाणा जिल्हा प्रचार दौऱ्याची आज सुरुवात झाली. शेगाव येथे आयोजित जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांवर जोरदार भाष्य केले. शेगाव परिसरात स्थानिक रोजगार निर्मितीची गरज अधोरेखित करताना, अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या उपजीविकेवर चालणाऱ्यांना हटवले जाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम नगराध्यक्ष उमेदवार दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी आणि सर्व वंचित समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावे, त्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा दिला जावा, हेच आमचे ध्येय असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
“वंचितांनी सत्ता आपल्या हातात घेऊन स्वतःचा विकास घडवावा,” असे आवाहन करत त्यांनी सभेचा समारोप केला. शेगावमधील ही सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.





