सुजात आंबेडकर :सर्वांनी जिद्दीने कामाला लागा, जिंकत आलेली लढाई आपल्याला हरायची नाही.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी ते प्रचार दौरे करत आहेत. अशातच प्रचाराच्या सततच्या मालिकेनंतर सुजात आंबेडकर हे अचानक बेशुद्ध झाले. अकोल्यातील कडक उन्हाळा आणि त्यात सततची पायपीट यामुळे ते बेशुद्ध झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
आंबेडकर यांना सध्या वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे. डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस विश्रांतीचा कडक सल्ला दिला आहे, तरी देखील या सल्ल्याला न जुमानता ते शहरातील एका बैठकीत सहभागी झाले होते.
उपचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांना 3 लिटर सलाईन देण्यात आले. यामुळे सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या प्रचाराचे कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले आहेत.
सर्वांनी जिद्दीने कामाला लागा; जिंकत आलेली लढाई आपल्याला हारायची नाही – सुजात आंबेडकर
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांनी आपल्या प्रकृतीची माहिती देत म्हटले आहे की, दोन दिवसांपासून माझी तब्येत ठीक नसल्याने मला सलाईन चढवण्यात आल्या आहेत. पण सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, काळजी करायची काहीच गरज नाही. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांनी दोन दिवसांची विश्रांती घ्यायला लावली होती. पण आपण काम थांबवू नका, जिद्दीने काम करायला लागा. मला जरी विश्रांती करायला लावली असेल तरी मी 14 एप्रिल भिमजयंतीपासून पुन्हा जोरदार कामाला लागणार आहे.
प्रचारात आपण मागे हटण्याची गरज नाही. जिंकत आलेली लढाई आपल्याला हारायची नाही. सर्वांनी जिद्दीने कामाला लागा. असा त्यांनी व्हिडीओ संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतचे वातावरण होते मात्र, आपण खचून जाऊ नका, मी लवकरच येतोय असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलंय.