नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरएसएस आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपूर दौऱ्यावर होते.
सुजात आंबेडकर म्हणाले की, “जोपर्यंत RSS संविधानाच्या चौकटीत येत नाही, भारताचे संविधान मान्य करत नाही, स्वतःची नोंदणी करत नाही आणि तिरंगा फडकवत नाही, तोपर्यंत आमची आरएसएस विरोधातील लढाई सुरूच राहील.”
राज्यातील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश सर्वत्र दिसत आहे. सरकारने त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत सुजात आंबेडकर म्हणाले, “आज उघडपणे लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे. भाजप लोकशाही संपवून स्वतःची मक्तेदारी निर्माण करत आहे.” यासोबतच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही उद्देशून प्रश्न उपस्थित केला — “उच्च पदस्थ नोकरशाह म्हणून तुम्ही यावर कारवाई करणार आहात की नाही?”
निवडणूक आयोगावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. २ डिसेंबरला होणारी निवडणूक पुढे ढकलून २० डिसेंबरला नेण्यात आली, यामागेही राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. “तडकाफडकी निवडणुका पुढे-मागे करणे, एकत्र घेणे किंवा उशिरा जाहीर करणे — हे सामान्य उमेदवारांनी निवडणूक लढवूच नये किंवा उभे राहिले तरी पराभूत व्हावेत, अशा प्रकारची यंत्रणा भाजप उभी करत आहे,” असे ते म्हणाले.
निवडणुका या सहज राहिलेल्या नाहीत. पैसा, ताकत असलेले लोकचं सत्तेत जातील आणि जे सत्तेबाहेर आहेत ते कायमच सत्तेबाहेर राहतील, यासाठी भाजपाने व्यवस्था निर्माण केली आहे.प्रेस क्लब, महाराजबाग रोड येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.





