मुंबई : लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आल्यानंतर ते नेमके कुठे आहेत, याबद्दल अजूनही अस्पष्टता आहे. त्यांच्या अटकेनंतर आणि लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वांगचुक यांच्या अटकेवरून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे.
वांगचुक यांच्या अटकेवर सवाल:
‘सोनम वांगचुक यांना चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. ते कुठे आहेत किंवा त्यांना कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आले आहे हे कोणालाही माहिती नाही,’ असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
लडाखच्या मागणीकडे दुर्लक्ष?
सुजात आंबेडकर यांनी लडाखमधील राजकीय परिस्थितीवरही बोट ठेवले आहे. भाजपने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे या प्रदेशाच्या विकास आणि प्रगतीला मोठा धक्का बसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयानंतर, लडाखमधील स्थानिकांनी भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेशासह राज्यत्व आणि संवैधानिक संरक्षणाची मागणी लावून धरली आहे. याच मागणीसाठी सोनम वांगचुक उपोषणावर होते. सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) अटक करण्यात आली असून त्यांना जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
भाजपचं उत्तर हिंसाचाराचं आहे:
लडाखमधील या मागणीवर भाजपचे उत्तर हिंसाचाराचे आहे, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी लडाखमधील नागरिकांचे आंदोलन तीव्र झाले आहे.