“अमेरिकेत सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या NRI वर तात्काळ कारवाई करा!”
अमरावती : अमेरिकेत भारताचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या विरोधात काही सवर्ण NRI व्यक्तींनी केलेल्या अपमानात्मक वर्तनानंतर आता मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कठोर पावले उचलण्याचे आव्हान दिले आहे.
दर्यापूर, अमरावती येथे झालेल्या संकल्प विजय महासभेत बोलतांना सुजात आंबेडकर म्हणाले की,“ जिथे जिथे अन्याय होणार, तिथे आंबेडकरवादी हे अन्यायाविरोधात आवाज उचलणार. न्या. भूषण गवई यांच्याशी आमचे कितीही मतभेद असले तरी त्यांच्यासोबत न्यायाधीश म्हणून घडलेली घटना चुकीची आहे. निषेधार्थ आहे.
अमित शहांना माझे स्पष्ट चॅलेंज आहे, अमेरिकेत सरन्यायाधीश गवई यांचा अपमान करणाऱ्या संबंधित सवर्ण NRI लोकांचा भारतीय पासपोर्ट रद्द करा, त्यांचे व्हिसा रद्द करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा विदेशात अपमान होणे म्हणजे संपूर्ण भारताचा अवमान आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलतांना सुजात आंबेडकर म्हणाले की, न्या. भूषण गवई यांनी एसटी, एसटीच्या आरक्षणात क्रिमिलियर आणि उपवर्गीकरण आणले. त्यावेळी न्या. गवई म्हणाले होते की, एका कुटुंबाला आरक्षणाचा लाभ भेटला असेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असेल, तर त्याच्या पुढील कुटुंबाला तो लाभ मिळू नये. त्यांना आमचे सांगणे आहे की, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये, तर इथल्या SC, ST, OBC चे सुरक्षा कवच आहे. जोवर या देशातील जाती व्यवस्था संपत नाही, तोवर आरक्षण हे सुरूच राहील.





