दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात संबंधित पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आज या प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती, मात्र पोलिसांच्या वतीने अतिरिक्त वेळ मागण्यात आली. न्यायालयाने ही विनंती स्वीकारत पुढील सुनावणीसाठी 30 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.
पीडित कुटुंबाच्यावतीने प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे हे सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.
या खटल्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते याकडे उत्सुकता आहे.