ॲड. प्रकाश आंबेडकर : उमरेड नागपूरमध्ये प्रचार दौरा
नागपूर : शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजप हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपसोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही मोदीची ताकद उखडून टाकायला निघालो आहोत. आम्ही त्यांना उघडे पाडत आहोत. जे तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत आहोत, म्हणून शाम मानव आणि तुषार गांधी यांना मिरच्या झोंबायला लागल्या आहेत. आपली चळवळ भक्कम राहिली पाहिजे. काँग्रेसवाले कितीही म्हणाले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. रामटेक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
आंबेडकर यांनी मोदी आणि भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदींची दमदाटी करून वसुली करण्याची पद्धत ही गल्लीतल्या दादापेक्षा वेगळी आहे का ? गावात जो वसुली करतो त्यालाही आपण गुंड म्हणतो, काँग्रेसवाल्यांना संधी आली होती, हे उघड करण्याची पण ते भूमिका घ्यायला तयार नाहीत. ते म्हणत आहेत की, आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि म्हणून आम्हाला मतदान द्या. यांचा नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे. शेवटी आपल्यालाच लढावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग हा शब्द मोदी आणि निवडणूक आयोगासंदर्भात वापरला होता. पण महाविकास आघाडीने तो प्रत्यक्षात महाराष्ट्रात उतरवला आहे. याचे उदाहरण देतो की, कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) यांनी जो उमेदवार दिला, त्या उमेदवाराला कल्याणची माणसं म्हणत आहेत की, हा उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढू शकत नाही. काँग्रेसचे नाना पटोले यांचे नाव भंडारा गोंदियामधून जाहीर झाले. काँग्रेसने नांदेडमध्ये चव्हाण नावाचा उमेदवार उभा केला जो आठवड्यातून तीन दिवस डायलेसिसवर असतो, तो तब्येत सांभाळणार की, प्रचार सांभाळणार ? मी अनेक उदाहरणे देऊ शकतो, यांच्या मनात चौकशीची भीती आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मॅच फिक्सिंग झाली आहे.
रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार घ्या, सर्वांना माहिती होते की, त्याचे जात प्रमाणपत्र टिकणार नाही. तरीही त्याला जबरदस्तीने उमेदवारी दिली आणि उमेदवारी रद्द झाली. त्यानंतर त्यांच्या पतीला उमेदवारी दिली. काँग्रेसचे अनेक नेते चौकशीखाली आहेत, दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, हेरॉल्ड या पेपरला नोटीस आली आणि 875 कोटींची संपत्ती जोडली गेलीय त्यामध्ये खरगे हे आरोपी आहेत. त्यामुळे लढण्याची इच्छाच यांच्यामध्ये दिसत नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मला विचारतात की, आमच्या नेत्यांना झालंय काय? मी त्यांना म्हणालो की, तिहार जेलचा रोग लागलेला आहे. आपण चिंता करू नका, आपण मिळून लढू, भाजपची सत्ता आपण घालवू असा जिल्ह्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता मला निरोप देतोय असा खुलासा करत आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपला हरवायचे ठरवले आहे, मात्र नेत्यांनी त्यांना वाचवायचे ठरवले आहे.
विशाल पाटील लढले, तर त्यांना पाठिंबा देवू
चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील आले आणि म्हणाले की, काय करायचं ? म्हटलं हिंमत असेल, तर लढा. विशाल पाटील लढले तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू अशी ग्वाही या वेळी ॲड. आंबेडकर यांनी दिली. तसेच सांगलीत काँग्रेसची ताकद आहे. सेना तिथे शून्य आहे. पण या काँग्रेसची एवढी ताकद नाही की, त्या शिवसेनेला (ठाकरे गट) सांगायचं की, मैत्रीपूर्ण होऊ द्या आम्ही तिथे आमचा उमेदवार उभा करतो, असेही आंबेडकर म्हणाले.