माजी कॅबिनेट मंत्री लवकरच ‘वंचित’मध्ये येणार
अकोला : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील संघटक आणि बंजारा समाजाचे नेते बी. डी. चव्हाण आणि अकोला जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्या गायत्रीताई कांबे, त्यांचे पती माजी तालुकाध्यक्ष संगीतराव कांबे व ओमप्रकाश पाटेकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. समाजातील अनेक समूहांना प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसते. प्रस्थापित पक्षांतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत आहेत.
सध्याचे राज्याचे राजकारण गढूळ झाले असून, या राजकारणाला स्वच्छ करण्याचं काम प्रकाश आंबेडकर हेच करू शकतात असा विश्वास कार्यकर्ते आणि जनतेला वाटत असल्याने मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे.
बी. डी. चव्हाण यांचाही प्रवेश
शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील संघटक आणि बंजारा समाजाचे नेते बी. डी. चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून, वंचित बहुजन आघाडीला मात्र मोठी ताकद मिळाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक प्रस्थापित राजकीय पक्षातून नेते आणि पदाधिकारी वंचितमध्ये प्रवेश करीत आहेत.
माजी मंत्री लवकरच येणार वंचितमध्ये
महाराष्ट्रातील अनेक नेते आणि राजकीय मंडळी वंचित बहुजन आघाडीत मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत असून, लवकरच एक माजी कॅबिनेट मंत्री वंचितमध्ये येणार आहे. तसेच अनेक जण वंचितमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणकीत वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढणार आहे.