८६ वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांचे अल्पचरित्र कु. शांताबाई रघुनाथराव बनकर या कुमारिकेने लिहीले. आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे, याला प्रस्तावना भास्करराव जाधव यांनी लिहिली होती. मुंबईत राहून अशा वयात त्यांनी ऐकीव व उपलब्ध तुटपूंज्या सामग्रीवर आधारित लिहीलेल्या या २० पानी अल्पचरित्राचे नक्कीच मोठे मोल आहे. मुक्ता साळवेंच्या निबंधाचे जेवढे महत्त्व आहे; तेवढेच यालाही महत्त्व आहे.
शांताबाई आपल्या हृद्गतमध्ये म्हणतात,”प्रत्यक्ष हें चरित्र लिहीण्यास आरंभ केल्यावर हें काम इतकेसे सोपे नाही हें दिसून आलें. कारण कै. सावित्रीबाई संबंधानें पुरेशी माहिती मला मिळू शकली नाही.” वंचित, बहुजनात असलेल्या विनम्र वृत्तीने त्या पुढे म्हणतात, “प्रेमळ वाचक बन्धुभगिनी ह्या चरित्रात काहीं चुकीचीं विधानें असल्यास, कुणावर चुकून प्रतिकूल टीका झाली असल्यास, अथवा चरित्र पध्दतशिर लिहीलें गेलें नसल्यास मला मोठ्या औदार्यानें क्षमा करतील अशी आशा आहे.” एवढी विनम्रवृत्ती दाखवूनही शांताबाईंवर अन्याय होत गेला. मुंबईतील ज्या शाळेत असताना त्यांनी हे अल्पचरित्र लिहीले; त्या शाळेतील शिक्षक मोरेश्वर वासुदेव दोंदे यांनी मुंबई ता.१५ मे १९३९ ला शांता बनकरनें केलेल्या या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.
यात ते म्हणतात, “कुमारी शांता बनकर हिने एक कार्यकर्त्या आदर्श महिलेचे छोटेसे चरित्र लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल कुमारी शांताचे मी अभिनंदन करतो.” पुढे ते खूप महत्त्वाचे लिहीतात,”कोणतेही चरित्र लिहीताना चरित्रनायक अथवा चरित्रनायिका या संबंधाची पुष्कळ माहिती लेखकास असावयास पाहिजे, हे खरे आहे. परंतु, ही अवश्य असणारी माहिती फारशी उपलब्ध नाही.” तरीही या चरित्राचे महत्त्व सांगताना ते लिहीतात,”अशा माहितीच्या अभावीसुध्दां चरित्रलेखन होऊं शकतें. परंतु त्यामध्यें मात्र चरित्र नायिकेचें कार्य बहुजनसमाजाला समजून सांगता येतें.”
परंतु, अशा ऐतिहासिक अल्प चरित्राचा साधा उल्लेखही संपादक: डॉ. मा.गो.माळी, साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य, पहिली आवृत्ती..ऑगस्ट १९८८ व आमचे मित्र, अभ्यासक-संशोधक हरी नरके यांनी संपादित केलेल्या महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, प्रथमावृत्ती २०१३ यांनी त्यांच्या मनोगत, संपादकीयात उल्लेख करावासा वाटला नाही. याचे आश्चर्य वाटते.
अपू-या साधनांचा वापर करून जरी हे अल्प चरित्र लिहीले असले, तरी ज्या कुमारीकेने, ज्या महितीच्या आधारे हे अल्पचरित्र लिहीले, ते जर वाचले, तर समजते यात सावित्रीबाईंच्या कामाचे नेमके स्वरूप व त्याचा वंचित बहुजन समाजातील मुलींवरही शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण होत होती. त्याचबरोबर इतिहासाची चिकित्सा करण्याची दृष्टी व मार्ग दिसले हेही शांताबाईंच्या लिखाणातून समजत जाते.
हीच या अल्पचरित्राची शक्ती आहे! त्याला आजचे सर्व निकष लावून पाहाता येत नाही. त्याचवेळी सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय या ग्रंथात संपादकाच्या मनोगतात १९२७ व १९३८ साली कै. पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी महात्मा फुले यांची दोन वेगवेगळी चरित्रे लिहीली आहेत, याचा नक्कीच उल्लेख आहे. ही तरी नक्कीच चांगली बाब आहे.
2
तरीही त्याकाळी बहुजन समाजातील एका मुलगीला-स्त्रिला सावित्रीबाईंवर लिहावेसे वाटणे हे तर खूपच महत्त्वाचे. त्याकाळी बहुजन समाजाची शिक्षणासह सामाजिक स्थिती विदारक होती. या पार्श्वभूमीवर शांताबाई चरित्रात सुरुवातीलाच लिहीतात,”तरीही कै. विष्णु शास्त्री चिपळूणकरांसारखे खंदे लेखक पण अनुदार बुध्दीचें टीकाकार हयात असताना, भोंदूशाही समाजांत थैमान घालीत असताना, जग नाशवंत आहे व भिक्षुक-ब्राह्मणांना दान दिल्याशिवाय मनुष्य प्राण्यास इहपरलोकी सुख लाभणार नाहीं, अशा कल्पनांचे वर्चस्व असताना एवढेच नव्हें, तर भिक्षुक ब्राह्मणांच्या मध्यस्थी खेरीज परमेश्वराच्या भक्तीचा उपयोग नाहीं. असें भोळ्या जनतेच्या मनावर बिंबवण्याचा अटोकाट प्रयत्न चालू असतांना आमच्या चरित्र नायिकेचा जन्म झाला”२ इतके अचूक महत्त्व शांताबाईंनी सावित्रीबाईंचे ओळखले होते, हे खूपच महत्त्वाचे होते. यातच चिपळूणकरादी ब्राह्मणी व्यक्तींचे स्त्रियांविषयीचे विचार मनुस्मृतीतील विचारांनुसार किती कार्यरत होते; शांताबाई हे स्पष्टपणे सांगतात. चिपळूणकरांचेच एक अवैज्ञानिक, अजब विचारसूत्र त्या सांगतात,” स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या मेंदूपेक्षा कमी वजनाचा आहे.
३ परंतु आमच्या वंचित बहुजनांच्या सत्य इतिहासातील सर्व कर्तबगार स्त्री नेते-विचारवंताची मोठी यादी आहे. यातीलच या फक्त सावित्रीबाई, मुक्ता साळवे, शांताबाईंसारख्या महान स्त्रिया आहेत!
आज २०२५ मध्ये इतकेही उच्चवर्णीय समतावादी-स्त्रिवादी समूह या भिक्षूक-ब्राह्मणशाहीची चिरफाड करत नाहीत, ही शोकांतिका आहे. भारिप बहुजन महासंघाने लोक समूहांसमोर २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन, हा भारतीय स्त्री-मुक्ती दिन साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली. वंचित बहुजन स्त्रीसमूह आणि सत्तेचे हक्क व स्वाभिमानाचे सामाजिक राजकारण सांगितले; तसे लिखाण, प्रबोधन चालूच आहे. तरीही हा दिन या सहकारी स्त्रिया उत्साहाने सर्वत्र साजरा करायला तयार नाहीत!
काहीना प्रमुख पाहुणे म्हणून या परिषदांमध्ये बोलायला आमंत्रितही केले होते. एवढ्या पूरते संबंध राहिले. व्यक्तिगत संबंध तर आहेतच. पण स्वतंत्रपणे २५ डिसेंबरविषयक भूमिकाही घेत नाहीत वा छोटासा का होईना कार्यक्रमही घेत नाहीत ही तर आणखी मोठी शोकांतिका आहे. याउलट, आजचे चित्र बिकट बनवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर ८६ वर्षांपूर्वी शांताबाई बनकर यांनी या लिहीलेल्या या अल्पचरित्राचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. यातून व सावित्रीबाई, जोतीरावांच्या लिखाणातून प्रस्थापित विचार चौकटीतून बाहेर यायचा मार्ग दिसेल.
आता तर आपल्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व राज्यघटनाही आहे! ब्रिटिश त्यांच्या व्यापार व नंतर राजकीय साम्राज्यासाठीच ते येथे आले होते. हे रा.स्व.संघ सोडून बाकी जगजाहीर आहे. ते आले आणि स्त्रिशूद्रातिशूद्रांसाठी ज्ञान संपादनाच्या खिडक्या सताड उघडल्या. परिणामी, त्यांना सभोवतालच्या कटू वास्तवाचे दर्शन झाले. आणि हे समूह जागृत होऊ लागले. म्हणूनच जोतीराव, सावित्रीबाई, बाबासाहेब म्हणतात, तसे ही मोठीच संधी प्राप्त झाली. वरकरणी ही दुटप्पी वाटणारी भूमिका हेच येथील फुले-शाहू-आंबेडकरी विचार-कृतींचे एक वैशिष्ट्य आहे. ते समजून घ्यायला यांचे विचार व कृतींची विविधांगी चिकित्सा करावी लागते. ते समजून घ्याव्या लागतील.
पारंपरिक चिकित्सा पध्दती व दृष्टितून बाहेर यावे लागेल. म्हणून संघपरिवार या परंपरेला, त्यांच्या मजबूत प्रेरणादात्यांना कायम घाबरून आहे. “सोडलं तर पळतं आणि धरलं तर पळतं” अशी त्यांची गत झालीय. सुधारकांनाही जोती-सावित्रीबाईंना सहकार्य करायला भीती वाटत असे. असे नमूद करून शांताबाई म्हणतात,” अशा बिकट परिस्थितीत महात्माजींनी (महात्मा जोतीरावांनी) सावित्रीबाईंना घरीच थोडेफार शिक्षण देऊन त्या शाळेवर शिक्षकीण म्हणून योजना केली. सावित्रीबाई आपल्या कार्यात अर्धांगी ह्या नात्याने अर्धा वाटा आपल्या शिरावर घेऊन मोठ्या कुशलतेनें पार पाडीत असत.” येथील सामाजिक वास्तवाचे भान असलेल्या शांताबाई त्याहीपुढे सांगतात,”त्या कालांत एवढ्या समतेनें महारमांगांच्या मुलांना एवढ्या आपुलकीच्या भावनेनें जवळ घेऊन त्यांना विद्यामृताची गोडी चाखण्यास लावणारी स्त्री विरळीच!”
४ आताच्या काळात ब-याच तरुण-तरुणींनी आंतरजातीय-आंतरधर्मीय-अगदी पोटजातीतही विवाह केले म्हणून घराबाहेर हाकलणारे, लेकरांना पळून जायला भाग पाडणारे बाप आहेत. तर त्याकाळी व्यवस्थेचा बळी असणा-या सास-याने फुले उभयतांना घराबाहेर हाकलेले. याचे कारण सनातन्यांनी सास-यांना घाबरून सोडले होते. तरीही या उभयतांनी त्यांनी हाती घेतलेले क्रांतिकारक कार्य चालूच ठेवले आणि त्याच्या परिणामी शांताबाईंसारख्या बहुजन लेकरांना शिकता आले.
आज कित्येक पिढ्या शिकून जगभर सर्व क्षेत्रांत वावरत आहेत. याचे सर्व श्रेय फुले-शाहू-आंबेडकरांनाच जाते. म्हणूनच आज ब्राह्मणी शक्ती वंचित बहुजनांना आरक्षणासह सारे शिक्षण मिळूच नये, यासाठीच त्यांचा आटापिटा चालू आहे. याचाच एक भाग वैदिक, मूल्य शिक्षण, अभ्यासक्रमात मनुस्मृती आणणे हा आहे. यापुढे शांताबाई सांगतात,”महाराष्ट्रात पुण्यासारख्या ठिकाणीं म्हणजे कट्टर सनातन्यांच्या माहेरघरीं महिलांकरितां स्थापन झालेली हीच पहिली शाळा होय.” या शाळेच्या अनन्यसाधारण महत्त्वा विषयी त्या म्हणतात, “भगिनींनो! अशा श्रेष्ठ दांपत्याचें की ज्यांनीं प्रथमच अज्ञ भगिनींना विद्यादेवीचें दर्शन घडविलें व विचारी बनवून अबला सजल्या जाणा-या आम्हां स्त्रियांची गुलामगिरीतून सोडवणूक केली, त्यांचें ऋण केव्हांही फिटणें शक्य आहें काय?”
५ आज जे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे वंचित बहुजनवादी पक्ष सामाजिक राजकीय सत्ता संपादनाचा संघर्ष करत आहेत, त्यांनाही लागू होईल, असे विचार या चरित्रात शांताबाई सांगतात,” ज्यांना उच्चतेच्या पदावर आरूढ व्हायचें असेल त्यांना लोकनिंदेकडे दूर्लक्ष केल्याशिवाय गत्यंतर नाही.” इथे लोकनिंदा या शब्दाला आज म्हणायला हवे आजी-माजी सत्ताधा-यांनी पोसलेले पत्रकार, तथाकथित विचारवंत” हे शब्द वापरायला पाहिजेत. यात सावित्रीबाईंना सनातन्यांनी जो त्रास दिलाय, त्याबाबत शांताबाई पुढे म्हणतात,”स्वत: सरळ मार्गाने जात असतांनासुध्दां जनतेकडून त्रास होवू लागला, तर त्याकडें दुर्लक्ष करणेंच योग्य ठरेल.”
६
हेच आजही वंचित बहुजन आघाडीचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर व वंचितविषयी अनुभवास येत आहे. प्रस्थापिताकडून असाच खोटा-नाटा प्रचार सुरू आहे. त्याचप्रमाणे आज ही ब्राह्मणशाही येथील वंचित बहुजन समाजाच्या डोक्यावर बसून जो काही हैदोस घालत आहे, हे अचूक भाकीत जोतीराव, सावित्रीबाई फुलेंप्रमाणे शांताबाईं बनकर यांनी तेव्हाच हेरले होते. त्या लिहीत आहेत, त्यांनी लोकांना ज्यातिष सांगून द्वंद्व मानविण्याचे प्रयत्न केले. “अमक्या गोष्टीमुळें तुमचें असें झालें, तेव्हां आतां करा भटाला दान. त्याशिवाय गत्यंतर नाहीं. नाहींतर तुम्हांला हें जन्मभर नडेल.”
७ जोतीराव आणि सावित्रीबाईंची केशवपन विरोधी, विधवा विरोधी चळवळी पाहून चिपळूणकर शास्त्रीबुवांचे मस्तक उलटें सुलटें झालें असे शांताबाई लिहीतात. त्याही या सा-यांची चांगलीच हजेरी घेतात.८ पण छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाच्या विविध प्रकारच्या कार्यास खूपच मदत झाल्याचेही नमूद करतात.९ शांताबाईंकडे साधने अपुरी असूनही तत्कालीन बारीक-सारीक महत्त्वाच्या खास करून सत्यशोधक समाजाच्या घटनांची आवर्जून नोंद घेतात. १९३३ मध्ये मुंबईला भरलेली ह्या समाजाची परिषद अखेरची ठरल्याचे नमूद करतात.१० १८९६ साली प्लेगच्या साथीत सावित्रीबाई व डॉ. यशवंतरावांचा बळी गेला.
तेव्हा शांताबाई चरित्राच्या अखेरीस एक खंत मात्र व्यक्त करतात. त्या म्हणतात,”ह्या श्रेष्ठ विभूतीचें चरित्र वास्तविक पाहातां ह्याच्या आधीच लिहीलें गेलें पाहिजें होतें. पण ” पुढे त्या सामाजिक वास्तव सांगतात,” मी खात्रीनें सांगतें कीं ही महासाध्वी जर ब्राह्मण समाजांत जन्मास आली असती तर तिचें चरित्र त्या समाजाकडून त्वरित लिहीलें गेलें असतें ”११ (संदर्भ: सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय, संपादक:डॉ. मा.गो.माळी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. आवृत्ती १ ली, ऑगस्ट १९८८, पान-२३-२४, समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्प चरित्र, लेखिका:-कु. शांताबाई रघुनाथराव बनकर, मुंबई, (प्रथमावृत्ति), किंमत सहा आणे., सन १९३९), पान १..२, वरीलप्रमाणे, पान,४, वरील प्रमाणे, पान..६, वरील प्रमाणे, पान..६, वरीलप्रमाणे, पान..९, वरीलप्रमाणे, पान..१०, वरीलप्रमाणे, पान..१३, वरीलप्रमाणे, पान..१५, १०)वरीलप्रमाणे, पान..१६, ११)वरीलप्रमाणे, पान..१९,
– मंगल खिंवसरा
मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?
मुंबई आणि पुण्यातील अॅप-आधारित टॅक्सी प्रवाशांना लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Ola आणि Uber च्या ड्रायव्हर्सनी केलेल्या संपानंतर राज्य...
Read moreDetails