आमदार कपिल पाटील यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची घेतली भेट
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना समाजवादी गणराज्य पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून ॲड. आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेस मोठी चूक करत असल्याचे म्हटले होते.
डॉ. अभय पाटील हे आरएसएसच्या विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिमविरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी अकोला येथील यशवंत भवन येथे ॲड. आंबेडकर यांची भेट घेवून पाठिंबा दिला.
यावेळी कपिल पाटील यांच्यासोबत समाजवादी गणराज्य पार्टीचे महासचिव अतुल देशमुख, प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे, अकोला जिल्हाध्यक्ष जिब्राईल दिवाण, माजी महापौर रऊफ पैलवान, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष भीमरावजी कोरटकर, अमरावती जिल्हा संपर्क सचिव योगेश निंभोरकर, पार्टीचे सचिव सचिन बनसोडे, विनय खेडेकर आणि अकोला परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.