सचिन माळी
फुल्यांच्या ‘जात्यांन्तक’ सत्यशोधकीय चळवळीला ब्राह्मणेत्तरी मानण्याची प्रथा डाव्या प्रवाहातही दिसून येते. डाव्या चळवळीने फुल्यांपासून प्रेरणाच घेण्याचे नाकारल्यामुळे त्यांच्या चळवळीला ब्राह्मणेतरी ठरवून मोकळे होणे डाव्यांच्या सोयीचे होते. याबाबत डॉ. रावसाहेब कसबे बिनतोड शब्दांत सांगतात की,
” भारतीय
कम्युनिस्ट चळवळीवर लोकमान्यांचा ( टिळक) इतका जबरदस्त प्रभाव पाडला गेला की, त्यामुळे लोकमान्यांचे वर्णन जसे ‘राजकीय जहाल आणि सामाजिक प्रतिगामी’ म्हणून भारतीय इतिहासाने केले, तशीच कम्युनिस्ट चळवळसुद्धा ‘आर्थिकदृष्ट्या
जहाल परंतु सामाजिकदृष्ट्या मवाळ’ बनली. हे
अटळ होते. चुकीच्या प्रेरणा स्वीकारण्याचा तो दुष्परिणाम होता. त्यामुळेच भारतात
खरा प्रोलेटारियट (पिळला गेलेला) जनसमुदाय कोणता या प्रश्नाचे उत्तर
कम्युनिस्टांना सापडू शकले नाही. म्हणून शेतमजुरांच्या संघटनांकडे, स्त्रियांच्या चळवळीकडे आणि जातिसंस्थेतून होणाऱ्या
पिळवणुकीकडे कम्युनिस्ट लक्ष देऊ शकले नाहीत. स्त्रियांना शिक्षणाची दारे मोकळी
करणारा, शेतमजूर
आणि छोट्या शेतकऱ्यांना
जातीपातीची बंधने झुगारून एकत्र आणणाऱ्या म.फुल्यांच्यापासून कम्युनिस्टांनी
प्रेरणा घेतल्या असत्या, तर
कम्युनिस्ट चळवळीतल्या चुका टाळता आल्या असत्या अशी माझी नम्र समजूत आहे ”
(जाड ठसा मूळचा)
फुल्यांच्या प्रासंगिकतेबद्दल बोलायला डावे असोत की अतिडावे असोत कुणीच तयार नाहीत. एकूणच डाव्या चळवळींना अजूनही फुल्यांच्या चळवळीचे नीट मूल्यमापन केलेले दिसत नाही. आधुनिक भारतातील पहिल्या समाजक्रांतिकाराची दखलच न घेणाऱ्या चळवळी सर्जनशीलताच हरवून बसल्या आहेत, हेच यातून सूचित होते. कॉ. शरद पाटील यांनी मार्क्सवाद- फुले – आंबेडकरवादाच्या संस्करणाने फुल्यांच्या तत्त्वव्यवहाराची दखल घेतलेली होती. त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नावच ‘सत्यशोधक’ कम्युनिस्ट पक्ष होते. कॉ. शरद पाटील यांनी फुल्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला होता परंतु, पुढे त्यांनीही सौत्रांतिक मार्क्सवादाचे संस्करण करताना फुलेवाद त्यांच्या विचार सृष्टीत अदृश्य केला !
शरद जोशी यांनी फुलेंच्या विचारांनी सशक्त शेतकरी आंदोलन उभे करून दाखवले. परंतु, त्यांना वरचढ श्रीमंत शेतकऱ्यांच्या पलीकडे जाता आले नाही. हे शेतकरी आंदोलन अतिशूद्र- दलितांशी (भूमिहीनांशी ) सख्य करण्याचा दिशेने गेले नाही. नवउदारवादी जागतिकीकरणात ‘शेतकरी चार चाकी गाडीतून फिरेल’ ही शरद जोशींची भविष्यवाणी खोटी ठरली. जेव्हा शेतकरी आत्महत्या करून चारचौघांच्या खांद्यावरून स्मशानात जाऊ लागला तेव्हा, शरद जोशींनी ब्राह्मणी फॅसिस्टांशी हातमिळवणी करून संसदेचा रस्ता धरला आणि सत्तेची फळं चाखायला सुरूवात केली! पर्यायी विकासनितीची मांडणी करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वात श्रमिक मुक्ती दलाने फुल्यांची सर्जनशील दखल घेतलेली असली, तरी त्यांनाही दलित भूमिहीन व कष्टकरी शेतकऱ्यांत जनाधार निर्माण करता आलेला नाही. त्याचबरोबर त्यांच्या प्रयोगशीलतेलाही मर्यादा पडलेल्या दिसत आहेत. बळीराजा धरण ही त्यांच्या श्रेष्ठ कृती होती.
फुल्यांची प्रासंगिकता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली म्हणूनच त्यांनी फुल्यांना आपले गुरू मानले. फुल्यांनी लोकभाषेत ‘शेटजी’ व ‘भटजी’ हे शत्रू सांगितले तर आंबेडकरांनी याच संघर्षाचे विकसित मॉडेल देताना समाजशास्त्रीय अर्थशास्त्रीय भाषेत ‘भांडवलशाही’ आणि ‘ब्राह्मणशाही’ या प्रमुख दोन शत्रूंवर शिक्कामोर्तब केले. फुले ‘निर्मिक’ मानत असले, तरी ते पूर्णतः इहवादी होते. निर्मिकाचा उल्लेख ते ‘सर्वांना निर्मिकाने निर्माण केलेले असल्याने सर्व सामान आहेत. कुणी उच्च नाही वा कुणी कनिष्ठ नाही’ हा समताविचार सांगण्यासाठी करीत. याउपर निर्मिकाला त्यांच्या किंमत नाही. फुल्यांचा इहवाद त्यांना आधुनिक भौतिकवादाचा जवळ नेणारा आहे. कॉ. शरद पाटील फुल्यांच्या इहवादाचे समीकरण यूरोपियन प्रबोधन युगातल्या रूसोच्या सेश्वर यांत्रिक भौतिकवादाशी करतात.
फुल्यांनी ब्राह्मणी शोषणाविरुद्ध जातीउतरंडीतील मार्जिनल किंवा मायक्रो-ओबीसी असणाऱ्या न्हाव्यांना प्रबोधित करून जगाच्या पाठीवरील ऐतिहासिक म्हणून नोंद घ्यावी लागेल असा न्हाव्यांचा संप घडवून आणला. मार्जिनल जातींना जात्यंतक बनवूनच आपण ब्राह्मणशाहीचा पराभव करू शकतो, याचे हा लढा एक रोल मॉडेल आहे. मार्जिनल जातींना हवे असलेल्या प्रतिनिधीत्वाचा संघर्ष उभे करून त्यांना जात्यंतक लढ्यात सामावून घेणे गरजेचे आहे. प्रलंबित लोकशाही क्रांतीच्या दिशेने जाताना फुल्यांचे हे रोलमॉडेल नक्कीच आपल्याला मदतगार ठरू शकते.
फुल्यांनी भारतीय प्रबोधन युगाचा पाया रचला आणि क्रांतिकारी प्रबोधन हे पितृसत्ताक जातीव्यवस्थेविरुद्ध असले पाहिजे हे लोक भाषेत, लोकशैलीत (Forms)आणि लोकजीवन परंपरेचा आधार घेऊन सांगितले. बळीराजाचे मिथ व त्याची वास्तवता उलघडून या देशात हजारो वर्षांपासून ब्राह्मणी, अब्राह्मणी संघर्ष सुरू असल्याने निदान सर्व प्रथम केले हे निदान डावे आजही स्वीकारत नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जे निकाल आले आणि त्यानंतर ब्राह्मणी धर्म संस्कृतीने मानलेले वर्चस्ववादाचे उघड प्रदर्शन पाहून काही डाव्यांनी भारतातील ब्राह्मणी-अब्राम्हणी या ऐतिहासिक सांस्कृतिक अंतर्विरोधाची दखल घ्यायला सुरुवात केलेली दिसते. हे आशादायी चित्र आहे भारतात लोकशाही क्रांती यशस्वी करण्यासाठी जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचे ऐलान करावे लागेल या माझ्या मताशी ( माझे पुस्तक, जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान) डाव्या पक्षांमधील अनेक कॉम्रेड सहमती दर्शवित आहेत. ही जात्यन्तक सांस्कृतिक क्रांती फुले आंबेडकरांच्या खांद्यावर उभे राहूनच पुढे जाणार आहे भारतीय प्रबोधन युग जोवर लोकशाही क्रांती पाहत नाही, तोवर फुले प्रासंगिक आहेत हे ठामपणे म्हणता येईल.
भटमुक्त भारताच्या घोषणा देणाऱ्यांना केवळ भटशाहीवर हल्लाबोल करण्यासाठी फुले हवे आहेत. त्यांना समग्र फुले विचार झेपत नाही. कर्मठ वर्गवाद्यांनी या देशातल्या पहिल्या अर्वाचीन समाजक्रांतिकारकावर उपेक्षेचे हत्यार चालवलेले आहे. परंतु माझ्या पिढीच्या जात्यन्तक क्रांतीच्या शिलेदारांना फुल्यांची प्रासांगिकता आणि सामर्थ्य लक्षात येऊ लागलेले आहे.
सचिन
माळी
shahirsachinmali@gmail.com
Contact No : 8802 194194