‘मूकनायक’चा वैचारिक वारसा

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

प्रतिमा परदेशी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जसे एक तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ होते, तसेच ते संपादक व पत्रकारही  होते. पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले पाहिजे असे महनीय कार्य त्यांनी केलेले दिसते. पत्रकारीतेचा अभ्यासक्रम तयार करताना मात्र, त्यांच्यासारख्या काही समाजप्रबोधक पत्रकारांचा नामोल्लेख विद्यापीठीय पाठ्यक्रमातून वगळला गेला होता. विसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी त्यांच्या पत्रकारीतेची दखल अकादमीय क्षेत्रात घेतली गेलेली दिसते.

आधुनिक काळाच्या प्रत्येक टप्प्यावर वृत्तपत्र, नियतकालिके व अनियतकालिकांचे अनन्य साधारण महत्त्व असते. आपली मते, आपली बाजू आणि आपली भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठीचे ते प्रभावी असे माध्यम असते. 19 व्या शतकात सुधारक, क्रांतीकारक, प्रतिगामी सर्वच छटांच्या महानीयांनी या प्रसिध्दी माध्यमांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलेले दिसते. सत्यशोधक चळवळीच्या नेत्यांनी ‘दीनबंधु’, ‘सत्सार’, ‘इशारा’, ‘सत्यप्रकाश’ अशी नियतकालिके समाज प्रबोधनासाठी चालविलेली दिसतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीसुध्दा या माध्यमांकडे जनप्रबोधनाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणूनच पाहिलेले दिसते. त्यांचे स्पष्ट मत होते की, समाज परिवर्तनासाठी चालविल्या जाणार्‍या चळवळींना स्वत:चे वर्तमानपत्र असायलाच हवे. ‘अन्यथा पंख तुटलेल्या पक्षासारखी अवस्था होऊन बसेल’. खरेतर त्यांनी एकप्रकारचा इशाराच समाजाला दिला आहे. वृत्तपत्र काढण्यावर त्यांनी भर दिला. ‘समता’, ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’, आणि ‘प्रबुध्द भारत’ त्यांच्या वैचारिक नेतृत्वाची धगधगती उदाहरणेच आहेत. ही वृत्तपत्रांची एक चळवळच त्यांनी चालवलेली दिसते. याची कारणेही तशीच महत्त्वाची आहेत.

भारतासारख्या जातिव्यवस्थेद्वारा प्रधान शोषण होणाऱ्या समाजात जातीअंताचा लढा उभा करताना त्यांना या वैचारिक चळवळीची गरज वाटणे स्वाभाविक होते. कारण, जातीअंताचा लढा हा जणू ‘अराष्ट्रीय’ प्रश्न मानला जात होता. एकोणीसाव्या शतकात जातीस्त्रीदास्यांताची चळवळ गतीमान करणाऱ्या सत्यशोधक चळवळीला ‘ब्रिटीशधार्जिणी’ ठरविण्यात आले. विसाव्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली गतीमान झालेल्या जातीअंताच्या चळवळीवरही ‘स्वातंत्र्य आंदोलनविरोधी’ असा ठपका ठेवण्यात आला. या चळवळींच्या नेमक्या भूमिका, वैचारिक मांडणी व कार्यक्रम समजवुनच घेतले गेले नाहीत. या भूमिका धारदारपणे समाजापुढे मांडण्यासाठी, आपल्या जनतेच्या जाणिवा-नेणिवा घडविण्यासाठी, तिला प्रबोधित करण्यासाठी व देशाच्या राजकारणात-समाजकारणात आपला हस्तक्षेप करण्यासाठी वृत्तपत्रांची आवश्यकता होती, याच नेमक्या हेतूने बाबासाहेबांनी विविध वृत्तपत्रे सुरू केली होती. कारण, या सामाजिक सर्वहारांची भूमिका समाजापुढे येण्यास अन्य दुसरा मार्ग नव्हता.

सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यापासून या सामाजिक सर्वहारांना जसे वंचित ठेवले गेले, तसेच या प्रस्थापितांच्या वृत्तपत्रातही उच्च जातीवर्गीयांच्याच हितसंबंधांना ‘जागा’ होती. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त यांना ना गावकुसात, ना वृत्तपत्रात ‘जागा’! ‘मूकनायक’च्या संपादकीयात म्हणूनच म्हटले होते, ‘इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा-केव्हा त्यांना अहितकारक असेही यातून प्रलाप निघतात.’ ही उणीव व धोका टाळण्यासाठी स्वत:चे असे वृत्तपत्र सुरु करण्यात आले ‘मूकनायक’.

मूकनायकमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सहकार्यांनी 31 जानेवारी 1920 मध्ये समाजाच्या वेदना व विद्रोहाचा जागर मांडला. खऱ्या ‘मूकनायकांनी’ सुरु केलेले हे मराठी भाषेतील पाक्षिक मुंबईहून निघू लागले. समाजातील एक उच्च शिक्षित पांडुरंग नंदराम भटकर हे या पाक्षिकाचे संपादक होते. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे अशक्य होते म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे देण्यात आली. पहिल्या अंकातील ‘मनोगत’ नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मूकनायकाचे ध्येय-धोरण म्हणचे बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविणे तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्या स्वरूपाची चर्चा घडवून आणणे हेच होते. याला अनुसरुन ‘मूकनायक’ शिर्षकाखाली संत तुकारामांचा अभंग छापला जात होता.

काय करुन आता धरुनिरा भीड ।

नि:शक हे तोंड वाजविले ॥1॥

नव्हे जगी कोण मुकियांचा जाण ।

सार्थक लाजोनी नव्हे हित ॥2॥

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळी याचप्रमाणे कधी एखाद्या सदरासाठी तर कधी लेखाचे शिर्षक म्हणून वापरलेल्या दिसतात. या संदर्भात त्यांचे मत लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या मते, ‘तुकारामाची गाथा वगळता सर्व मराठी साहित्य जरी समुद्रात बुडाले तरी मराठी समाजाचे फार नुकसान होणार नाही. इतके महत्त्व त्यांच्यालेखी संत तुकाराम व तुकाराम गाथेचे होते.’ आता भीड धरून चालणार नाही तर जगात जरी ‘मूक लोकांची’ जाण नसणारे असले तरी आता आपल्याला त्यांच्या हितासाठी झटावे लागेल हा मतितार्थ ‘मूकनायक’ने स्वीकारला होता.

‘मूकनायक’चे हे शताब्दी वर्ष आहे. निर्ऋतीच्या वारसदारांनी 1920 ते 2020 या शताब्दी वर्षानिमित्त काही संकल्प केला पाहिजे. ‘मूकनायक’ आज आपल्याला प्रेरणा देतो ती जातीअंताच्या लढ्याची. ब्राह्मणशाहीच्या नेमक्या शोषणाची. स्त्रीपुरूष सहजीवनाची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मूळ गाभ्याचा भाग हा जातिव्यवस्थाविरोधाचा राहिला आहे. त्यांनी एकीकडे जातीव्यवस्थेचा इतिहास, तिचे शोषक स्वरूप, तिची संरचना याबद्दल सैध्दांतिक मांडणी केली. ‘जातीव्यवस्था म्हणजे श्रेणीबध्द विषमता’ असे सिद्धांतन केले. तर दुसरीकडे जनतेचे प्रबोधन करताना ‘मूकनायक’ सारख्या अंकांमधून जातीव्यवस्थेची चिकित्सा सर्वसामान्यांना मजेल अशा भाषेत केलेली दिसते. ‘हिंदुसमाज हा एक मनोरा आहे. व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय….या मनोऱ्यास शिडी नाही’ ही ‘जातीव्यवस्था म्हणजे श्रेणीबध्द विषमता’ याची साध्यासोप्या भाषेतील मांडणी होती.

14 फेब्रुवारी 1920 च्या दुसऱ्याच अंकात ‘वर्तमानसार’ सदरात “सामाजिक बाबतीत स्वयंनिर्णयाच्या तत्वास रा. टिळक यांचे धोरण विघातक असल्यामुळे त्यांना देशाचे खरे पुढारी म्हणता येत नाही.” असे म्हणत लोकांना टिळकांचे दुजाभावाचे राजकारण लक्षात आणून दिलेले दिसते. स्वातंत्र्य आंदोलनाचा पडदाफाश करत ‘हे स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य!’ हे पटवुन देत जातीभेद व धर्मभेद जोपर्यंत जारी आहे तोपर्यंत हिंदुस्थान देश स्वराज्यास लायक नाही असे जातीला प्राधान्य देणारी भूमिका विशद केली आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत परिषद व नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदांचा सविस्तर वृत्तांत प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यातून या परिषदांमध्ये झालेले विचार मंथन लक्षात येते. शिक्षणादी मागण्यांसाठीचा संघर्ष आधोरेखित होतो. शिवाय सर्वाधिक शोषित जातीतील स्त्रियांनी या परिषदांमध्ये बजावलेली कामगिरीही लक्षात येते. आज एकविसाव्या शतकात जातीअंताची चळवळ गतीमान करताना आपल्याला ‘मूकनायक’ मधील विचार प्रेरणा देतात. ज्या जातीव्यवस्थेविरूध्द आपल्याला लढा संघटित करायचा आहे, तो करताना तिचे बदलते स्वरूप आपण नेमकेपणाने लक्षात घेतले पाहिजे ही शिकवण बाबासाहेबांची वृत्तपत्रे व इतर ग्रंथातील लिखाण आपल्याला देते. जुन्या कालबाह्य विचार व वैचारिक हत्यारांनी आपण आजच्या काळात जातीअंताचा लढा यशस्वीतेच्या दिशेने नेऊ शकत नाही, हा विचार या शताब्दी वर्षात आपण लक्षात घेऊन 21व्या शतकात विविध क्षेत्रात उभ्या राहिेल्या आव्हानांना कसे सामोरे जाणार आहोत याचे सतत चिंतन, अभ्यास करण्याची प्रेरणा व मार्गदर्शन ‘मूकनायक’ आपल्याला करतो.

‘जिवंत राष्ट्र म्हणून काही एखादी सामान्य व्यक्ती नव्हे. जसें एकच माणूस म्हणजे कुटुंब किंवा एकच घर ह्मणजे समाज किंवा गाव अगर प्रांत किंवा देश होऊ शकत नाही, तद्वत् एका राष्ट्रांतील एकच विवक्षित जात अगर समाज म्हणजेच एक राष्ट्र होऊ शकत नाही. तर एकापेक्षा अधिक माणसे मिळून एक कुटुंब, अशी अनेक कुटुंबे मिळून एक समाज, समाज मिळून गांव, व गांवें मिळून प्रांत अगर राष्ट्र होऊ शकते. एका कुटुंबांतील माणसांमध्रे एकमेकाविषरीं जशी आपलेपणाची भावना असते, तशीच ती प्रत्येक समाजांत असल्याशिवाय राष्ट्राचा जिवंतपणा दिसणे शक्य नाही आणि ज्या ठिकाणी हा जिवंतपणा नसेल, त्या ठिकाणी इतरांच्या चढाओढीत अपयशच असणार!’ अशी भूमिका ‘मूकनायक’ मधून मांडण्यात आली आहे. राष्ट्र कशाला म्हणायचे याचा सविस्तर विचार यात व्यक्त झाला आहे. अलीकडे राष्ट्र संकल्पनेचा संकुचित वापर, त्याचा ब्राह्मणी पुरुषसत्ताक अर्थ सांगत समाजात हिंसाचार माजवला जात असताना राष्ट्राची ही जातीअंताच्या परिप्रेक्षातील चर्चा महत्त्वाची ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म. गांधीशी वैचारिक वाद करताना राष्ट्राची चर्चा केली होती. गांधींना ‘Mr. Gandhi, I have no motherland’  हे ऐकवले होते. भारतासारख्या जातीसमाजात दोन राष्ट्र अहेत. एक गावकुसाच्या आतले राष्ट्र आणि दुसरे गावकुसाच्या बाहेरचे. राष्ट्र संकल्पनेच्या आड येणार्या जातीव्यवस्थेकडे बाबासाहेबांनी लक्ष वेधले होते. ‘मूकनायक’ मधून राष्ट्र म्हणजे फक्त नकाशा नसतो, लोकांचा वास्तव्य असलेला भूभाग असतो. त्यावर वास्तव्य करणाऱ्या मूठभर व्यक्ती, कुटुंब म्हणजे राष्ट्र नाही याची आठवण जनतेला करुन देत राष्ट्रात गोरगरीब जनतेचाही समावेश होतो हे आधोरेखित करण्यात आले आहे. आज राष्ट्र जणू फक्त गोरक्षकांचे, धर्मांधशांचे, रास्वसंघाच्या कार्यकर्त्यां पुरुषांचेच असल्याचे मानत इतरांना दुय्यम नागरिक ठरविण्याचा घाट घातला जात आहे. आता तर एनआरसी व सीएएसारख्या कायद्यांनी राष्ट्र, राष्ट्रीयत्व याच्यावरच नवे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘मूकनायक’च्या शताब्दी वर्षात आपण निऋर्र्तीच्या वारसदारांनी खर्या अब्राह्मणी राष्ट्र व राष्ट्रीयत्वासाठी संघर्षशील होत ‘मूकनायक’चा वैचारिक वारसा पुढे नेला पाहिजे.

(लेखिका प्रबुद्ध भारत संपादक मंडळाच्या सदस्य, मासिक सत्यशोधक जागरच्या संपादक व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष आहेत.)   


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *