कोरोना आणि वंचित घटक !

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

स्वतःला वंचित घटक म्हणून घ्यायला इथल्या मध्यमवर्गाला आवडत नाही किंबहुना स्वतःच्या प्रिव्हिलेज स्टेटसला सूट करत नाही असा आविर्भाव असतो आणि मग प्रत्येक मध्यमवर्गीय स्वतःला या शब्दापासून वेगळा करायला पाहतो. 

पण वंचित घटक म्हणजे नक्की कोण ?

ज्यांना इथल्या व्यवस्थेनं योग्य रोजगाराची, उत्तम शिक्षणाची, अल्प दरात आरोग्य सेवेची, पायाभूत सुविधा सहजपणे उपलब्ध करून दिली नाही ती व्यक्ती वंचित घटकामध्ये येते. एकीकडे वाढत जाणारी शहरं तर दुसरीकडे ओस पडत जाणारी खेडी. ही जनता 

देखील योग्य सुविधांपासून वंचित असल्या कारणाने स्थलांतरित झालेली असते. राजकीय अजेंड्यामध्ये बळीचा बकरा बनवली जाते. इथली भांडवलशाही पूरक व्यवस्था ज्यांना हवी तशी वापर करून घेते आणि आणीबाणीच्या काळात वाऱ्यावर सोडून देते. पण, यामध्ये तर इथली जवळपास ७०% ते ८०% जनता येते. पण, या जनतेला आपल्यासोबत काही चुकीचं घडत आहे. इथली राजकीय व्यवस्था ही कशी मूठभर लोकांसाठी काम करत असते व जनतेसमोर भावनिक व अस्मितेचे प्रश्न उभे करून एकमेकांसोबत भांडायला भाग पाडते याची जाणीव नसते. एकीकडे राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव बड्या भांडवलदार हस्तींना महाबळेश्वरला पोहचवण्यासाठी स्वतःचे विशेष अधिकार वापरून पाठवण्याची व्यवस्था करतात, तर दुसरीकडे लाखो सर्वसामान्य लोक हजारो किलोमीटरची पायपीट करत आपल्या गावी चालत जाताना दिसतात, ही भीषण विषमता आपल्या देशाची खूप मोठी समस्या आहे आणि आज या कोरोनाच्या जागतिक संकटामध्ये याची जाणीव सर्वसामान्य जनतेला होईल व ती तटस्थपणे परिक्षण करून इथल्या राजकीय व्यवस्थेला जबाबदारीने प्रश्न विचारायला लागेल ही माफक अपेक्षा. 

कोरोनाचा पहिला रुग्ण हा १७ नोव्हेंबर २०१९ रोजी चीनमध्ये तर ३० जानेवारी २०२० मध्ये भारतामध्ये सापडला. ३० जानेवारी ते २१ मार्चपर्यंत आपण फक्त इव्हेंट्समध्ये मग्न होतो. २४ व २५ फेब्रुवारीला केंद्र सरकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे स्वागत करत होते, तर २४ मार्चपर्यंत केंद्रातील सरकार मध्य प्रदेशमध्ये राज्य सरकार बनवण्यामध्ये मश्गुल होते. यादरम्यान कोणत्याही शासकीय अथवा राजकीय यंत्रणेला खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर कोणतेही निर्बध अथवा आरोग्य तपासणीची दक्षता घ्यावीशी वाटली नाही. आपला देश आपण अशा लोकांच्या हातात देत आलेलो आहोत जे फक्त राजकीय हित पाहतात त्यांच्यासाठी देश नेहमी दुय्यमच असतो. आपल्यामध्ये फक्त लोकशाहीचा मुलामा लावलेली भांडवलशाही व्यवस्था कार्यन्वित आहे याची जाणीव इथल्या जनतेला होत नाही किंबहुना होऊ दिली जात नाही. आज याच बेजबाबदार राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण देश बंद करून बसण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आलेली आहे. यांच्यामध्ये असणारा दूरदृष्टीचा अभाव व नियोजनशून्यता इथल्या सर्वसामान्यांच्या जीवावर घाला घालत आहे. टाळ्या, थाळ्या, मेणबत्ती, दिवे पेटवणे या प्रकाराला समर्थन देऊन अथवा विरोध करून फक्त दिशाभूल होते पण, मूळ प्रश्न सुटत नाहीत. 

 इथल्या डॉक्टरांना वैयक्तिक संरक्षण उपकरणे उपलब्ध नाहीत त्यांना त्यासाठी आंदोलन करावं लागत आहे ही शरमेची बाब आहे. पोलीस, नर्सेस, आशा वर्कर्स, सफाई कामगार यांची सुरक्षा राम भरोसे आहे. भविष्यात उदभवणाऱ्या आर्थिक, सामाजिक समस्येसाठी आपण तयार नाही.   

आज ज्यांचे रोजनदारीवरचे पोट आहे ते इथल्या सामाजिक संस्था, राजकीय संघटना व सरकारी मदत यांच्यावर अवलंबुन आहेत. सरकार मदत किती लोकापर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहे हे आपण पाहत आहोतच.  इथल्या शेतकऱ्यांची अवस्था ही काही वेगळी नाही. शेतीमध्ये नाशवंत पीक (भाजीपाला, फळबागा.) घेतलं गेलं आहे पण, मार्केटपर्यंत पोहचवण्याची किंवा साठवण्याची योग्य सुविधा नसल्यामुळे ते शेतातच खराब होत आहे. त्यामुळे शेतकरीदेखील अडचणीत सापडला आहे. त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही, तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत चालले आहेत.  त्या वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत. या तफावतीवर सरकारने केलेल्या उपाययोजना या फक्त कागदावरच दिसून येत आहेत. आज आपण सर्वजण या संकटांचा सामना करत उभे आहोत पण, या काळामध्ये, व येणाऱ्या काळामध्ये उभी राहणारी बेरोजगारीची समस्या याला आपण तोंड द्यायला कितपत समर्थ आहोत हे येणारा काळच सांगेल. या महामारीच्या सोबतच भूकमारीच्या संकटांचा सामनादेखील आपल्याला करावा लागणार आहे. 

 आज देखील आपल्या सरकारी दवाखान्यांची असणारी परिस्थिती, त्याच्याकडे असणारी आवश्यक साधनसामुग्री व तपासणी यंत्रणा किती अपुरी आहे याची जाणीव पावलोपावली होत असतानादेखील आपण जगातील सर्वात उंच पुतळा बांधण्याचा अट्टहास करणारा देश आहोत. अस्मिताधारित स्मारकांचा देश आहोत. आपल्याला दवाखाने, शाळा, प्रयोगशाळा, पर्यावरण हे विषय कधीच गंभीर वाटत नाहीत. आपल्या देशाने आरोग्यविषयक धोरणाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष याचे परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागतील. आपल्या देशातील वर्तमानपत्र व न्यूज चॅनेलवर चालणाऱ्या द्वेषाला बढावा देणाऱ्या डिबेट्स, पेड न्यूज आपल्याला योग्य माहितीपासून वंचित ठेवत असतात व राज्यकर्त्यांना अनुकूल असणाऱ्या बातम्या दाखवत आहेत. आपल्या देशातील या लोकशाहीच्या चौथ्या खांबाने आपली विश्वासहर्ता कधीच गमावली आहे. त्यामुळे सत्य सर्वसामान्यापर्यंत पोहचू दिले जात नाही. आणि या सगळ्यांना इथला प्रत्येक असहाय्य व्यक्ती म्हणजेच वंचित घटक बळी पडत असतो. इथला प्रत्येक कोरोना बळी हा भांडवलशाहीला पूरक असणाऱ्या व्यवस्थेने केलेला खून असेल.

– विकास ओव्हाळ 


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *