नाचु; फटाके-बंदुका उडवू; निर्लज्जपणे वाढदिवस करु; तरीही आम्ही —!

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

संघ-भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या एकविसाव्या दिवसाच्या आधी देशवासियांना दिवसभर “जनता कर्फ्यु” पाळायचे आवाहन केले होते. त्याला खूपच चांगला प्रतिसाद जनतेने दिला. त्याचदिवशी सायंकाळी पाच वा. स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाच्या पेशंट्सना सेवा देणा-या डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, ऍम्बुलन्सचे ड्रायव्हर्स, पोलिस, आदी अत्यावश्यक सेवेतील आणि सार्वजनिक क्षेत्रांतील कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थाळ्या वाजवायला; घंटा बडवायला; पणत्या-टॉर्च लावायला हे आवाहन होते. त्याप्रमाणे काहींनी पाळलेही. पण, काही “अतिप्रामाणिक भक्त” त्यांच्या लेकरा-बाळांसह रस्त्यावर आले! ढोल-ताशा वाजवून नाचले. घोळक्याने मिरवणुका काढल्या. काहींनी साधुंसारखे शंखही वाजवले. “कोणत्या” तरी आनंदात त्यांनी हवेत गोळीबारही केला. वर्धाच्या भाजपच्या आमदाराने, तर त्याचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा केला; भाजप आणि सेनेच्या दोघांनी बंदी असतानाही पंढरपुरात विठ्ठलाची सहकुटुंब महापुजा केली! गर्दी गोळा केली! कोरोनाचे सारे गांभीर्य नष्ट करीत आहेत. मोदींचीच माणसे ही! सत्तेचा माजच तो!

संघ-भाजपचे पंतप्रधान नेहमी अमेरिकन अध्यक्षांचे नको तितके गळ्यात पडुन कौतुक करत असतात. इतकेच नाही, तर तिकडे दिल्ली जळत असताना गृहमंत्र्यांना सोबत ठेवुन अमेरीकन अध्यक्षांसोबत गुजरातसह सर्वत्र फिरतच राहिले. त्याचवेळी सर्वत्र कोरोनाने धुमाकुळ घालायला सुरुवात केली होती. त्याच अमेरीकन अध्यक्षांनी “हायड्रो-क्लोरोक्विन” गोळ्यांसाठी भारताला दम दिल्याच्या बातम्या येत होत्या. पाठोपाठ भारतातील निर्यातीत ढील देवुन एक कोटी गोळ्या अमेरिकेला दिल्याचीही बातमी आली! भारताने आपल्याकडील महत्त्वपूर्ण औषधं अमेरीकेसह शेजारील गरीब राष्ट्रांना मानवतेच्या दृष्टीने द्यायला हवीच. कारण भारत या गोळ्यांचा एक मोठा देश आहे. पण, अशा दमदाटींना भीक घालायची नसते. ताठ राहून ही मदत द्यायला हवी. “केविलवाणी गळा भेट” घेऊन असा ताठरपणा दाखवता येत नाही. हे आता तरी लक्षात घ्यायला हवा. की यामागे आणखी काही कारण आहे?

त्याचबरोबर आपल्याकडील आरोग्याशी निगडीत साहित्य पुरविण्यावर खास लक्षही दिले पाहिजे. त्याला प्राधान्यच हवे. नाहीतर डॉक्टर्स, नर्स, पोलिस, सफाई कामगार, आदी अतिआवश्यक सेवा देणारे सेवक जर कोरोनाग्रस्त झाले; तर मात्र,काय हाल होतील याची कल्पना न केलेलीच बरी!

देशभर कोरोग्रस्तांचा आकडा का वाढत आहे? मुंबईत धारावी, वरळी कोळीवाडा, आदी. झोपडपट्ट्यांत कोरोना पसरत आहे. १० एप्रिलपर्यंत हा चौदाशेच्यावर पोचला आहे. याचा आणि या साऱ्या भावनिक उपक्रमांचा काडीचा तरी संबंध आहे का? अख्ख्या भारतात केरळ, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यात वाढणाऱ्या केसेसच्या पार्श्वभुमीवर पण, बिगर संघ-भाजप राज्यांतील हे मुख्यमंत्री, त्यांची सरकारं खूपच चांगली कामं करताहेत. राजस्थानमधील “भिलवाडा (जिल्हाधिकाऱ्यांचा) पॅटर्न” अशी ही मॉडेल्स देशभर नेण्याऐवजी केवळ भावनिक उपक्रमांच्या “बिनकामी” घोषणा पंतप्रधानांनी परत परत कराव्यात ही शोकांतिका आहे!

भारतीय ब्राह्मणी धर्म संस्कृतीत बहुसंख्य : स्त्रिशुद्रादीशूद्रांना “अस्पृश्य” मानले होते. आताच्या संदर्भात “सोशल डिस्टंसिंग” मानले गेले होते. येथील मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, आदी धर्मियांबाबतही ही “विशेष अलगता” दाखविली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने “फिजीकल डिस्टंसिंग” हे शब्द वापरुनही कोरोना विषाणुसंदर्भात केंद्र सरकारने देशभर “सोशल डिस्टंसिंग” ही संकल्पना का पसरवली? संघ कोणतेही पाऊल उचलते त्यामागे निश्चित असा डाव असतो. तसा या मागेही कट असणार हे नक्की!

कोरोना विषाणुने चीनमधील वुहान शहरात थैमान घातले होते. जगभर तो पसरु लागला होता. या पार्श्वभुमीवर भारतात २३ जानेवारी २०२० रोजी कोरोनाग्रस्त वुहान शहरातुन भारतात प्रथम ६० विद्यार्थी आले. आणि ३० तारखेला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हाच भारताने सावधानता बाळगायला हवी होती. त्यानंतर वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या बड्या उद्योगपतींच्या जवळ जवळ ७०० मुलं-मुलींना खास विमानं सोडून भारतात परत आणण्यात आले. मात्र सा-यांना विना तपासणी विमानतळाबाहेर सोडले गेले! आणि त्यांच्यासोबत आलेला कोरोना भारतात सर्वत्र पसरु लागला! तरीही एम्सचे डॉक्टर्स सावधानतेच्या सूचना देत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतरही पार २४ मार्चपर्यंत केंद्रातील संघ-भाजपला कोरोना माहितच नव्हता की मुद्दाम लक्ष देत नव्हते? याविषयी वृत्तपत्रं गप्प. लोकशाहीचा हा चौथा खांब झोपला होता!

त्यावेळी संघ-भाजप अडकला होता अमेरिकन अध्यक्षांना गुजरातला नेणे; मध्यप्रदेशमधील कॉंग्रेस सरकार पाडून त्यांचे स्वत:चे सरकार बनविणे; आदी प्रकरणात गुंतला होता.

मात्र, जगातील परिस्थितीतून योग्य धडे घेत २२ मार्चपासूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने लॉकडाऊन घोषित केले. केरळ, दिल्ली राज्यांनी तर कामगार –  कष्टक-यांसाठी अत्यंत चांगली पावलं उचलली होती. सर्वत्र या तिन्ही बिगर संघ-भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक होवू लागले होते. त्यामुळे काही दिवस संघ-भाजप पूर्णपणे बाजुला पडल्याचे दिसत होता. हे पाहिल्यावर संघ-भाजपच्या केंद्र सरकारने म्हणजेच पंतप्रधान मोदींनी नंतर घाईघाईत नोटाबंदीप्रमाणे २३ रात्री ८ ची (?) वेळ घेऊन देशभर चार तासांनी म्हणजे रात्री बारा लॉकडाऊन जाहिर केले! ना कुणा राज्याला विश्वासात घेतले; ना देशातील स्थलांतरित आणि राज्या – राज्यांतील हातावरचे पोट असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार केला. या स्थलांतरितांना वाऱ्यावर सोडले. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार (मागचा पुढचा विचार न करता) देशभर तीन आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे भारतात अनौपचारिक क्षेत्रांत काम करणारे हातावर पोट असणारे स्थलांतरित व अन्य मिळून चाळीस कोटी मजुर फसले. आठ एप्रिलची वृत्तपत्रे ही बातमी घेऊन बाहेर पडली. शेतकरी-शेतमजूर-कारागीर-डोंगरातील आदिवासी-भटके-विमुक्त मिळुन सुमारे ७५-८०% भारतीय जनतेला एका क्षणात अंधाऱ्या, खोल खाईत ढकलले! एवढेच नाही, तर कोरोनाशी निगडीत आरोग्य व्यवस्थेचा आढावाही घेतला नाही. यात गुप्तता वा देशाच्या संरक्षणाशी निगडीत काहीही बाब नव्हती. मग ही जिवघेणी अतिघाई केंद्राने का केली?

भारत आरोग्यसेवेत मागे आहे. “जागतिक आरोग्य संघटनाने (WHO)” डॉक्टर आणि लोकसंख्या यांचे प्रमाण १: १,००० सांगितले आहे. यासंदर्भात भारताच्या लोकसभेत आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले होते की, एक डॉक्टर (आधुनिक औषध) आणि लोकसंख्या प्रमाण ०.७७: १,००० होते. मंत्री पुढे म्हणाले होते की, डॉक्टर-लोकसंख्येचे प्रमाण सुधारण्यासाठी देशातील डॉक्टरांची संख्या वाढविण्यावर सरकारचा भर आहे. प्रत्यक्षात मात्र, काहीही केले नाही. आणि आता कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांच्या पहाणीतुन सर्व बाबींची कमतरता पुढे येत आहे. नर्सेस, डॉक्टर्स तशी मागणी करत आहेत. नियोजनाचा केंद्र बिंदु ना आरोग्य होता ना सामान्य कष्टकरी माणूस, ना पुरेसे बजेट! म्हणुन राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील अविकसित जिल्ह्यांत लाखो मजुर कुटुंबं पायी निघाले आहेत. वाटेतच मृत्युमुखी पडत आहेत. हा “आधुनिक फिरता डिटेंशन कॅंप” आहे! मोदी आणि संघ-भाजपला हेच साधायचे होते का?
आज केंद्र आणि राज्य सरकारने या स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी फक्त “विविध सामाजिक संस्था –एनजीओवर सोडली आहे. महाराष्ट्र सरकारने आता कुठे पावले उचलायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश संघ-भाजपच्या “योगी” राज्यात तर या मजुरांवर विषारी फवारणी केली. त्यांना जंतु मुक्त करण्यासाठी! संघ-भाजप या मजुर समुहाला “जंगली प्राणी” च मानतो!

सार्वजनिक क्षेत्रातील संघटीत कामगार विरुध्द  असंघटीत, कष्टकरी-स्थलांतरित मजूर असा तणाव उभा राहत आहे. तो चुकीचाही आहे. शोषणावर आधारित व्यवस्था हा तणाव त्यांच्या फायद्यासाठी वाढवीत आहे. पण, तो तणाव ना सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटना दुर करु शकल्या ना त्यांचे धोरण-कार्यक्रम-भूमिका-विचारसरणी! कारण, बदलल्या काळानुसार मुल्य कायम ठेवुन धोरण-कार्यक्रम-कार्यपध्दतीत आवश्यक बदल करु शकले नाही हे त्या- त्या कामगारवर्गीय राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाचे मोठे अपयश आहे. आता कोरोना विषाणुने ही एक ऐतिहासिक संधी दिली आहे. या दोन स्वाभाविक सहकारी समूहांमध्ये परस्पर विश्वास, संवाद आणि मैत्रीचे नातेसंबंध निर्माण होवु शकतात. तसे वातावरण नक्कीच निर्माण होत आहे. मात्र, मुख्य जबाबदारी नेत्यांची आहे. वाईटातुन नक्कीच चांगले निर्माण होऊ शकेल! राजकीय शहाणपण आणि दृष्टी हवी!

२४ मार्चपासून कोरोना विषाणु निर्माण करत असलेल्या बिकट परिस्थितीशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार खुप प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नसतानाही खूप चांगल्या पध्दतीने जनतेशी संवाद करत आहेत. विशेषत: स्वत: ठाकरे खुप साधे, तळमळीचे व्यक्तिमत्व म्हणुन समोर येत आहेत. आजही ते केंद्र सरकारच्या दोन पावलं पुढे आहेत. त्यानंतर केवळ तीन हप्त्यांत त्यांच्या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण “जीआर” काढले आहेत. यातील थेट कोरोना आरोग्याशी निगडित “जीआर” जसे महत्त्वाचे आहे; तसेच स्थलांतरित-कष्टकरी समूहाशी निगडीत “जीआर” ही खूप महत्त्वाचे आहेत. सवाल आहे; यांची वेळेत, परिणामकारक अंमलबजावणी कशी, कोण करणार? त्यासाठी सरकारची प्रशासकीय यंत्रणा प्रत्येक, गाव, वॉर्डात आहेच. पण, त्यावर विशेषत: सार्वजनिक वितरण व्यवस्था, आर्थिक मदतीचे पॅकेज, इ. संवेदनशिलदृष्टीने देखरेख करणारी यंत्रणा प्रशासकीय सदस्यांसोबत लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक समुहांतील स्त्री-पुरुष प्रतिनिधी यांची मिळुन संयुक्त समिती हवी. 

सारा मुस्लीम समाज एक आहे हे मानणे चुकीचे आहे. ज्यांना दहशतवादी, हिंसा करणारे म्हणतात; त्यांचे कुणीच सामान्य मुस्लीम कष्टकरी माणूस समर्थन करत नाही. सामान्य हिंदू, बौध्द, ख्रिश्चन, पारशींची जेवढे भारतावर प्रेम आहे; तेवढेच मुस्लीम समुहाचे प्रेम आहे. मात्र, संघ शाखांवर सतत मुस्लीम व काही धर्मियांविरोधी विषारी-विखार सांगितला जातो. ते सर्व राष्ट्रविरोधी आहेत असेच पढविले जाते. आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्माच्या नावाने अप्रत्यक्षपणे ब्राह्मण श्रेष्ठत्व व पावित्र्यच पढविले जाते. सामान्य हिंदू बहुजनांना गंडविले जात आहे. आजही तेच चालु आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकाही डोळ्यांसमोर आहेतच. उलट वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रारंभापासून कोरोनासंदर्भात राज्य-केंद्र सरकारच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे असेच वारंवार आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे एप्रिल-२०२० मधील फुले-आंबेडकर जयंती घरीच साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यासाठी गोळा केलेल्या रकमेतून कोरोनाग्रस्तांना मदत करावी असेही आवाहन केले आहे.

या पार्श्वभुमीवर संघ-भाजपचे नोटाबंदीनंतरचे अपयश- “अक्षम्य चूक” आणि कोरोनाचे संकट समजण्यातील “महाचूक” लपविण्यासाठी कोरोनाचे सारे खापर निझामुद्दीन मरकजवर फोडण्यात येत आहे. आणि हिंदुंना मुस्लिमांविरोधात उसकावले जात आहे. मात्र, महाराष्ट्रासह भारतात अनेक बाजारपेठा, भाजी बाजार, आदी ठिकाणच्या गर्दींमुळे कोरोनाचा किती प्रसार होत आहे याची चर्चा शून्य आहे. एखाद दुसरे वाक्य, फोटो दाखविला जात आहे. “फक्त हिंदु (?) दुकानदारांकडुनच वस्तु घ्या; डॉक्टरांकडे जा.” असा भडकाऊ प्रचार सुरु आहे. सोशल मीडियावर खोटा-नाटा प्रचार सुरु आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत नाही! भिती फक्त संघ-भाजपविरोधी शक्तींनाच! सारा मीडिया केंद्राचा मिंधा आहे! “एनडीटिव्ही” याला अपवाद आहे! यात खरे म्हणजे दिल्ली शासन-प्रशासन, तबलिक धर्मगुरु यांच्याही चुका आहेत. सर्व सहभागींना त्या-त्या राज्यातील आरोग्य विभागासमोर हजर राहा ही भूमिका घ्यायला सुध्दा त्यांनी बराच वेळ घेतला हेही अक्षम्यच आहे. हे सारे निषेधार्य आहे.

संघ-भाजपचे गृहमंत्री आणि मोदींचे उजवे हात आजकाल कुठे आहेत? अमेरिकन अध्यक्ष परत गेल्यापासुन ते गायब आहेत? की एखाद्या अन्य “खास” राजकीय कामात आहेत? सारेच संशयास्पद! मात्र त्यांची सारी पोलिस फौज स्वत:चा जीव धोक्यात घालुन रात्रंदिन रस्त्यावर उभी राहुन इमाने-इतबारे काम करीत आहे. जयभिम, सलाम या संवेदनशील, मानवीय फौजेला! केंद्र मात्र,थाळ्या-मेणबत्ती लावुन मिरवायच्या भंपक घोषणा करीत आहे!

शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१८५७
Email: [email protected]


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *