पुणे : रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सतत लढा देऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वडार समाजाच्या वतीने पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे पार पडला.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘मी सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करतो. या प्रकरणात सोमनाथच्या कुटुंबाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली, त्यामुळेच कायद्यातील त्रुटी उघड झाल्या आणि या केसमध्ये ताकदीने लढता आले.’
न्यायालयीन कोठडीतील मृत्यू कमी होण्याची शक्यता
या प्रकरणाबद्दल बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूनंतर आता कोर्ट याबाबतीत नियमावली तयार करणार आहे. यामुळे देशातील न्यायालयीन कोठडीतील मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे. ही नियमावली देशभर लागू होईल आणि यापुढे न्यायालयीन कोठडी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल.
सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने आहे
याचबरोबर, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकार पोलिसांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात उभे राहिले, यावरून हे सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने आहे, हे स्पष्ट झाल्याचेही ॲड. आंबेडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘जे पोलीस या हत्येत दोषी आहेत, त्यांना अत्यंत कडक शिक्षा कशी होईल, हाच आमचा प्रयत्न असेल.’ या प्रकरणात कोर्टाने एसआयटी (विशेष तपास दल) स्थापन केली आहे.’
कोर्टाने आपल्याला एक संधी दिली आहे, की एसआयटी योग्य काम करतेय की नाही, हे पाहता येईल. जर त्यांनी काम योग्य केले नाही, तर विजयाबाईंना कोर्टासमोर तसा अर्ज करून आक्षेप घेता येईल.’ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे म्हणाले, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले की सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. एखाद्या व्यक्तीला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवल्यावर त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोर्टाची असते.’
या सत्कार सोहळ्यात ॲड. आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या लढ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना धीर दिला. या कार्यक्रमाचे आयोजन वडार समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल नारायण जाधव यांनी केले होते. या सत्कार सोहळ्याला वडार समाजातील अनेक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.