पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदारांना पैसे देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहरात निवडणुकीतील पहिला मोठा गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांचे पुत्र किरण चांदेरे यांच्यासह एकूण १५ जणांवर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री बाणेर परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. प्रचाराच्या नावाखाली मतदारांची वैयक्तिक माहिती गोळा करणे आणि मदतारांना पैसे वाटून प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी एका महिलेला कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा केला असून, तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने पावले उचलली. या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मतदारांच्या गोपनीय माहितीचा निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीने वापर करणे तसेच मतदारांना पैसे देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उघड उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध कलमान्वये किरण चांदेरे आणि त्यांच्या इतर १४ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा हा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी टीका करण्यात येत आहे.
निवडणूक काळात मतदारांवर कोणत्याही प्रकारचे दडपण किंवा प्रलोभन दाखवणे हा गुन्हा आहे. प्राथमिक पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.”






