पुणे : केवळ मित्राचा मोबाईल न विचारता वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यात एका २५ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड रोडवरील धायरी परिसरात घडलेल्या या प्रकरणात नांदेड सिटी पोलिसांनी तीन तासांतच दोन आरोपींना अटक केली आहे.
देवा उर्फ देवीदास पालते (२५, मूळ रा. मुखेड, नांदेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गजानन हरिश्चंद्र राठोड (३२, रा. यवतमाळ) आणि रुद्र शिवाजी गवते (२७, रा. धायरी, पुणे) या दोन कंपनी कामगारांना अटक करण्यात आली आहे. दिनेश राठोड नावाचा तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवा, गजानन आणि रुद्र हे तिघेही कामगार असून धायरी येथे एकत्र राहत होते. देवा याने गजाननचा मोबाईल न विचारता वापरल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि गजानन व रुद्र यांनी देवाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. मारहाणीत देवा गंभीर जखमी झाला.
जखमी देवाला त्याच अवस्थेत सोडून दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. नांदेड सिटी पोलिस ठाण्यातील कर्मचारी शिवा क्षीरसागर यांना घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी देवाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अवघ्या तीन तासांत पसार झालेल्या गजानन आणि रुद्र यांना अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी मोबाईलच्या वापरावरून झालेल्या वादानंतर देवाला मारहाण करून खून केल्याची कबुली दिली.
परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक: मित्राच्या मोबाईल वापरावरून वाद, पुण्यात तरुणाची हत्या
पुणे : केवळ मित्राचा मोबाईल न विचारता वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यात एका २५ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात...
Read moreDetails