पुणे : बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भारतीय संविधानाच्या प्रती, महापुरुषांच्या पुस्तकांची तसेच संविधान प्रस्ताविकेची विटंबना केल्याचा गंभीर आरोप होत असताना, या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करत वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर “सुनील वारे हटाव – बार्टी बचाव” या घोषवाक्याखाली बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता समाजकल्याण कार्यालय, आगरकर नगर (पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, पुणे स्टेशन) येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
संविधान व महापुरुषांचा अपमान तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान या गंभीर घटनेविरोधात आंदोलनादरम्यान सुनील वारे यांची तात्काळ हकालपट्टी, निलंबन व बडतर्फीची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व सागर आल्हाट (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर) करणार असून, या प्रसंगी ॲड. अरविंद तायडे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर), अनिताताई चव्हाण (अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर), चैतन्य इंगळे (अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर), विशाल कसबे (अध्यक्ष, माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन, पुणे शहर) आणि पद्यश्री साळवे (अध्यक्ष, रेल्वे कामगार आघाडी, पुणे शहर) उपस्थित राहणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीने सर्व संविधानवादी, बहुजनवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.