मुंबई महापालिकेत वंचितचे खाते उघडणारच!
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार परिषद राजगृह मुंबई येथे झाली. यावेळी सत्ताधाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागाळली.
“मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडी खाते उघडल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प, बेस्टचे खासगीकरण आणि मुंबईच्या बिघडलेल्या लोकसंख्याशास्त्रीय संतुलनावर (Demography) भाष्य केले.
धारावी प्रकल्पात ५७ हजार कोटींचा नफा; अदानींशी केलेला करार रद्द करणार?
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय फंडिंग मिळण्याची शक्यता असतानाही उद्धव ठाकरेंनी हा प्रकल्प अदानींना दिला. आमची सत्ता आल्यास या प्रकल्पाचा फेरविचार केला जाईल. या प्रकल्पातून ५७ हजार कोटींचा नफा अपेक्षित आहे, मग हा नफा महापालिकेला का मिळू नये? बिल्डर, नगरसेवक आणि आमदारांचे नेक्सस तोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मुंबईतील वीज पुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. मुंबई शहरात स्वस्त वीज मिळते, पण उपनगरात ती महाग आहे. पूर्वीचा टाटांसोबतचा करार संपल्यानंतर बेकायदेशीरपणे हा पुरवठा रिलायन्स आणि आता अदानींकडे गेला आहे. उपनगरातील वीज पुरवठा पुन्हा ‘बेस्ट’कडे (BEST) वळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून उपनगरातील जनतेलाही स्वस्त वीज मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी टक्का वाढवण्यासाठी ‘माटुंगा-परळ’ फायनान्शिअल सेंटरचा प्लॅन
मुंबईला सिंगापूरच्या धर्तीवर दक्षिण-पूर्व आशियाचे आर्थिक केंद्र बनवण्याचा मानस आंबेडकरांनी व्यक्त केला. परळ आणि माटुंगा येथील रेल्वेच्या जागेवर नवीन फायनान्शिअल सेंटर उभारण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, एसआरए (SRA) योजनांमुळे मुंबईतील मराठी टक्का घटल्याचा आरोप करत, महापालिकेच्या जागेवरील घरांमध्ये प्राधान्याने १ लाख मराठी कुटुंबांना वसवून मराठी टक्का पुन्हा वाढवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महापालिकेतील ‘अंधाधुंदी’ कारभाराची चौकशी होणार
मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये (FD) झालेल्या घसरणीवर त्यांनी बोट ठेवले. “दोन लाख कोटींच्या आसपास असणारी पालिकेची एफडी आता ९२ हजार कोटींवर आली आहे. या प्रशासकीय कालावधीतील अंधाधुंदी कारभाराची चौकशी केली जाईल,” असे ते म्हणाले. सोबतच, पालिकेच्या बजेटमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी प्रत्येकी ५ टक्के निधी कायद्यानुसार आरक्षित ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले, चतुर्थ श्रेणीतील कामांसाठी कंत्राटी पद्धत राबवणे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी बेस्टच्या खासगीकरणाचा डाव मोडून काढण्याचा इशारा दिला. तसेच, एसआरए प्रकल्पांमध्ये जोपर्यंत बिल्डर पात्र रहिवाशांशी रेंट एग्रीमेंट करत नाही, तोपर्यंत त्यांना बिल्डिंग परमिशन दिली जाणार नाही, असा नियम लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी भाजपवर तोफ डागताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपला परराष्ट्र धोरण कळत नाही, ते केवळ धार्मिक राजकारणासाठी देशाला बळी देत आहेत. माध्यमांमध्येही केवळ मंदिर-मशिदीच्या चर्चा आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा करायला कोणाकडेही जागा नाही.






