जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे काही दिवसांपूर्वी जमावाकडून झालेल्या हल्ल्यात २१ वर्षीय सुलेमान पठाण या मुस्लीम तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आज (३० ऑगस्ट २०२५) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुलेमानच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी ॲड. आंबेडकर यांनी सुलेमानच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. कुटुंबातील सदस्यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून सुलेमानला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार नातिकोउद्दीन खतीब, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
सुलेमान पठाणच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ॲड. आंबेडकर यांच्या या भेटीमुळे पीडित कुटुंबाला काहीसा आधार मिळाला आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.