नवी दिल्ली : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भारताचे शेजारी देश असलेल्या बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामागे अमेरिकेचा अदृश्य हात असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील भू-राजकीय परिस्थिती नव्याने घडवण्याचा हा अमेरिकेचा सुनियोजित प्रयत्न आहे.
बांगलादेश, नेपाळ या दोन्ही देशांतील आंदोलने जरी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि लोकशाहीचा ऱ्हास यांसारख्या स्थानिक समस्यांमुळे सुरू झाली असली तरी, या आंदोलनांचा फायदा घेऊन मोठे राजकीय संकट निर्माण करण्यात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे नाकारता येणार नाही.
दक्षिण आशियातील बदलती समीकरणे –
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने पाकिस्तानमधील चीनचा प्रभाव आधीच कमी केला आहे. आता आपण बांगलादेश आणि नेपाळमध्ये भारत समर्थक आणि चीन समर्थक सरकारे कोसळताना पाहत आहोत.
बांगलादेश : भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला पायउतार व्हावे लागले.
नेपाळ : चीन समर्थक पंतप्रधान के.पी. ओली यांना ‘जनरेशन झी’च्या नेतृत्वाखालील आंदोलनांमुळे राजीनामा द्यावा लागला.
या घटनांवरून असे दिसून येते की, अमेरिका दक्षिण आशियामध्ये एका मोठ्या भू-राजकीय रणनीतीचा भाग म्हणून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.