मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले मत देणार आहेत. यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपली कंबर कसली असून, फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या जनतेने पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी युतीच्या माध्यमातून, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले की, “सत्तावंचित घटकांचा आवाज महानगरपालिकेत पोहोचवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे.”
‘गॅस सिलेंडर’ चिन्हाचा जागर
निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हावर आपले उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे सांगत, या चिन्हापुढील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपला आवाज बुलंद करण्यासाठी आणि प्रस्थापितांना शह देण्यासाठी मतदारांनी एकजुटीने मतदान करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महानगरपालिका निवडणुकीत सत्तापरिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले.





