ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना आवाहन
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन केले. मुख्यतः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात सहभागी होऊन आपले मत मांडावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर म्हणाले की, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या 76 लाख मतांबाबत इलेक्शन कमिशनकडे कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. आयोग स्वतःच माहिती नसल्याचे सांगत असेल, तर ही निवडणूक प्रक्रियाच संशयास्पद ठरते. ‘फ्री अँड फेअर इलेक्शन’ हा संविधानाचा मूलभूत अधिकार असून, तो पाळला गेला नसेल तर निवडणुका रद्द करण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.
नोव्हेंबर 2025 मध्येच सर्व पक्षांना एकत्र न्यायालयीन लढाई लढण्याचे आवाहन पत्राद्वारे केले होते, असे आंबेडकरांनी सांगितले. मुंबई हायकोर्टाने आमची याचिका फेटाळल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून, इतर पक्ष ‘पक्षकार’ म्हणून आले तर हा मुद्दा अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींनी कर्नाटकमधील एका मतदारसंघातील बोगस मतदारांचा खुलासा केल्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र, हा मुद्दा फक्त पत्रकार परिषदेत न मांडता सुप्रीम कोर्टातही मांडणे आवश्यक आहे. काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे, त्यांनी या प्रकरणात हजर राहून युक्तिवाद करावा, असे त्यांनी सुचवले.
आंबेडकरांनी हेही नमूद केले की, इलेक्शन कमिशनने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
सुब्रमण्यम स्वामी यांच्या खटल्याचा दाखला देत आंबेडकर म्हणाले की, व्हीव्हीपॅटद्वारे मतांची पडताळणी बंधनकारक आहे. जर ती होत नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सर्व पक्षांनी एकत्रितपणे करावी. ही लढाई कोर्टाची आहे. जनजागृती महत्त्वाची असली तरी निर्णय फक्त न्यायालय घेऊ शकते, असे आंबेडकरांनी ठामपणे सांगितले.