मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३९ मध्ये वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार स्नेहल अरुण सोहनी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. ही जाहीर सभा लुंबिणी बाग, गोवंडी येथे पार पडली. सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

सभेत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. २०१४ पासून देशात सत्तेत असलेल्या सरकारने विकास व भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत आल्यानंतर विकासाचा कार्यक्रम आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिका बाजूला पडल्याचा आरोप त्यांनी केला. “धार्मिक राजकारण आणि समाजात ध्रुवीकरण वाढवण्याचे काम सुरू झाले,” असेही त्यांनी नमूद केले.

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या विचारांचा वारसदार मानवतावाद घेऊन चालतो. “समाजपरिवर्तनासाठी चळवळ चालवणारी माणसे हवी आहेत आणि त्यासाठी प्रथम स्वतःमध्ये बदल आवश्यक आहे. सत्ता ही विचारांवर चालते; मात्र सध्याचे केंद्र व राज्याचे धोरण संविधान बदलणारे आणि धार्मिक ध्रुवीकरण करणारे आहे,” असे ते म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास मुंबईतील प्रत्येक वस्तीला सकाळी १० वाजेच्या आत स्वच्छ पाणी पुरवण्याचे आश्वासन दिले. “ही निवडणूक केवळ उमेदवारांची किंवा पक्षाची नसून, मुंबईतील प्रत्येक नागरिकाची आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास मुंबई महानगरपालिकेचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील या जाहीर सभेत मोठा जनसागर उसळला होता. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला चुरस लागली असून वंचित बहुजन आघाडी सध्या आघाडी घेताना दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीत जोरदार बाजी मारण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.






